Wed, Jun 26, 2019 01:40होमपेज › Jalna › आधी लगीन लोकसभेचे म्हणत नवरदेवाने भरला उमेदवारी अर्ज 

आधी लगीन लोकसभेचे म्हणत नवरदेवाने भरला उमेदवारी अर्ज 

Published On: Mar 28 2019 4:22PM | Last Updated: Mar 28 2019 4:19PM
जालना : प्रतिनिधी

जालना लोकसभा मतदारसंघात गुरुवारी (ता.२८) उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्‍या दिवशी तालुक्यातील धारकल्याण येथील पदवीधर नवरदेव सुदाम श्रीमंतराव इंगोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्याच्यासोबत वर्‍हाडी मंडळीही  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले होते.

धारकल्याण येथील सुदाम इंगोले यांचा तालुक्यातील उज्जैनपुरी येथे गुरुवारी (ता.२८) सायंकाळी सात वाजता विवाह होणार आहे. या विवाहासाठी धारकल्याणमधून वर्‍हाडासह जातांना मुंडावळ्यासह नवरदेव सुदाम हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. ''आधी लगीन कोंडाण्या''चे या म्हणीप्रमाणे इंगोले यांनी आधी लोकसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. 

यावेळी सुदाम इंगोले यांना सदर प्रतिनिधींनी निवडणूक का लढवावीशी वाटते? असा प्रश्‍न विचारण्‍यात आला, त्‍यावेळी ते म्‍हणाले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीला कंटाळून आपण स्वतः निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे. त्या दृष्टीने उमेदवारी दाखल केली असल्याचे सांगीतले. जालना लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात नवरदेवाने उमेदवारी अर्ज भरण्याचा  हा पहिलालाच  प्रसंग असल्याची चर्चा या निमित्‍ताने ऐकावयास मिळाली. जिल्हा निवडणूक अधिकारी रविंद्र बिनवडे यांच्याकडे सुदाम इंगोले यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.