होमपेज › Jalna › अपघातानंतर माणुसकीला फुटला नाही पाझर 

अपघातानंतर माणुसकीला फुटला नाही पाझर 

Published On: Feb 28 2018 2:28AM | Last Updated: Feb 28 2018 2:28AMजालना : प्रतिनिधी

मंगळवारी बसस्थानकात औरंगाबाद -जालना बसने प्रवासी महिलेस धडक दिली. या महिलेचा  हात बसच्या समोरच्या चाकाखाली अडकल्याने ती जीवाच्या आकांताने ओरडत होती. बसस्थानक प्रवाशांनी भरलेले असतानाही एकानेही मदत केली नाही, मात्र ड्युटीवर असलेले पोलिस कर्मचारी गजानन गावंडे यांनी चाकाखालून महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. महिला निघत नसल्याचे पाहून त्यांनी मदतीची याचना केली, मात्र कोणीच पुढे येत नसल्याने त्यांनी रिक्षाचालकाच्या मदतीने महिलेस रिक्षात टाकूू न जिल्हा रुग्णालयात नेले. दुर्दैवाने महिलेला वाचविण्यात यश आले नाही.

स्थळ ः जालना बसस्थानक, वेळ सकाळी साडेदहाची. औरंगाबाद -जालना बस  (एम. एच.20 बी.एल. 762) ने भरधाव स्थानकात प्रवेश केला. त्यावेळी स्थानकात उभ्या असलेल्या तीर्थपुरी येथील लताबाई लक्ष्मण खंडागळे (47) या  महिलेस बसने धडक दिली. त्यात महिलेचा हात अडकला. जीवाच्या आकांताने लताबाई ओरडत होती. यावेळी बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होती. जमाव बसजवळ जमा झाला. त्यात एसटीचे चालक व वाहकही सहभागी होते, मात्र एकही जण बसखाली सापडलेल्या महिलेच्या मदतीसाठी पुढे आला नाही. 

पोलिस कर्मचारी गजानन गावंडे यांनी धाव घेत बसच्या चाकाखालून महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र एकट्याला ते शक्य नसल्याने त्यांनी प्रवाशांकडे मदतीची याचना केली. मात्र प्रवाशांसह एसटीच्या चालक व वाहकांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यानंतर रिक्षाचालक शेख शरीफ शेख रउफ यांनी पुढे येत पोलिस कर्मचारी गावंडे यांना मदतीचा हात दिला. त्यानंतर शेख शरीफ याच्याच रिक्षातून लताबाई खंडागळे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. शेख शरीफ यांनी पैसे न घेता माणुसकी दाखवली.  लताबाई औरंगाबाद येथून नुकत्याच जालना स्थानकात उतरल्या होत्या. त्यांना तीर्थपुरी येथे जायचे होते. त्यावेळी अपघाताची  घटना घडली. त्यांच्या पश्‍चात 1 मुलगा व 2 मुली असा परिवार आहे. या प्रकरणी औरगाबाद सिडको आगाराचे चालक उत्तम धनाजी वाणी याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.