होमपेज › Jalna › पावसाअभावी पिके सुकू लागली 

पावसाअभावी पिके सुकू लागली 

Published On: Aug 13 2018 1:23AM | Last Updated: Aug 13 2018 1:19AMअंबड : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील हस्तपोखरी, लालवाडी, पारनेर, मसई, शेवगा, धनगर पिंप्री, दहीपुरी-दुधपुरी, हारतखेडा, वाघलखेडा, काटखेडा, भाटखेडा, बोरी, भालगाव, पराडा इत्यादींसह परिसरात पावसाअभावी  मका, सोयाबीन, मूग, उडीद,  बाजरी, तूर, कपाशी इत्यादी पिके सुकू लागली आहे.

ढगाळ वातावरणाने दररोज शेतकर्‍यांना पाऊस चकवा देत आहे. बियाणे, खते, खुरपणी, फवारणी इत्यादी भरमसाठ शेतीखर्च करूनही पावसाअभावी पिके हाती लागण्याची शक्यता नसल्याने शेतकर्‍याची हाताशी येणारी पिके पावसाअभावी हातून जाण्याच्या भीतीने या परिसरातील शेतकरी चिंतातुर झाले आहे.  तसेच परिसरात दमदार पाऊस नसल्यामुळे तलाव कोरडेठाक आहेत, विहिरी, बोअरला सुद्धा पाणि नाही. कपाशीला फुले व पात्यातच अळ्या निर्माण होताना दिसते आहे.सरकार व प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांतून होत आहे. आधीच संपूर्ण तालुका अवर्षण भागात मोडतो त्याचे याही वर्षी दुष्काळाचे सावट समोर दिसत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर चिंता स्पष्ट दिसत आहे.

प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा

तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावत आहे. लघु व मध्यम प्रकल्पांत जेमतेम पाणीसाठा आहे. मोठा पाऊस न पडल्यास आगामी काळात तालुक्यावर पाणीटंचाईचं संकट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.