Fri, Sep 20, 2019 21:27होमपेज › Jalna › मिरचीवरील रोगाने डोळ्यांत पाणी 

मिरचीवरील रोगाने डोळ्यांत पाणी 

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 19 2018 12:30AMमाहोरा : प्रतिनिधी

गेल्या चार-पाच वर्षांपासून जाफराबाद तालुक्यातील माहोरा परिसरात मिरची पिकावर चुरडा-मुरडा रोगाने थैमान घातले आहे.  चार वर्षांत हा रोग या भागातील मिरचीवर येत असल्याने शेतकर्‍यांना बहरात आलेले मिरचीचे पीक उपटून टाकावे लागत असल्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. या रोगावर सध्या तर कुठलाच उपाय नसल्याने मिरचीचे पीक शेतकर्‍यांसाठी धोकादायक बनले आहे.

माहोरा परिसरात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर  मिरचीची लागवड केली आहे. मागील वर्षी मिरची पिकावर हा रोग आला होता. मात्र रोग उशिरा आल्याने शेतकर्‍यांना  मिरचीचे किमान  तीन-चार तोडे मिळाले होते. त्यामुळे त्या शेतकर्‍यांचा लागवडीचा खर्च निघाला होता.यावर्षी हिरवी मिरचीच्या  भावात वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून चार हजार ते साडेचार हजार रु. क्विटलपर्यंत मिरची विक्री होत आहे. मागच्या वर्षी पाचशे रुपये क्विंटल या भावाने शेतकर्‍यांनी मिरचीची विक्री केली होती, पण या वर्षी भावात चांगलीच वाढ झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर या वर्षी मिरचीच्या पिकातून दोन पैसे मिळतील अशी आशा असतानाच  मिरची पिकावर चुरडा-मुरडा रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे मिरची उत्पादनात कमालीची घट झाली आहे. सध्या  शेतकर्‍यांचा लागवड खर्च निघणेदेखील अवघड झाले आहे. एकीकडे हिरव्या मिरचीच्या भावात तेजी व दुसरीकडे मिरची वर आलेला रोग यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. या रोगावर उपाय नसल्याने पीक उपटून टाकावे लागणार आहे.

गणित बिघडले : शेतकर्‍यांचे आर्थिक गणित बिघडले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. ज्या शेतकर्‍ंयानी मल्चिंग अंथरून व बेड करून मिरचीची लागवड केली त्यांच्या मिरची पिकावर कमी प्रमाणात हा रोग दिसत आहे, पण ज्या शेतकर्‍यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला नाही, अशा शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ होणार हे मात्र निश्‍चित आहे. हा रोग पिकावर येताच संपूर्ण पीक उपटूनच टाकावे लागते.