होमपेज › Jalna › धामणगावात रणरागिणींचा दारूविरोधात रुद्रावतार !

धामणगावात रणरागिणींचा दारूविरोधात रुद्रावतार !

Published On: Jun 21 2018 1:25AM | Last Updated: Jun 21 2018 12:39AMकुंभार पिंपळगाव : प्रतिनिधी 

घनसांवगी तालुक्यातील श्रीपत धामणगाव येथे मुख्य रस्त्यालगत व मंदिर परिसरात अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे बुधवार,  20  रोजी संतप्‍त झालेल्या रनरागिणींनी  रस्त्यावर उतरून  अवैध देशी दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडत आपला रोष प्रगट केला. महिलांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे अवैध दारू विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. 

श्रीपत  धामणगाव  येथे काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीला महिला कंटाळल्या आहेत. गावातील युवा व पुरुषवर्ग दारूच्या आहारी जात असल्याने महिलांमध्ये असंतोष खदखदत आहे. दारू बंदीसाठी महिलांनी गावात आंदोलन, रास्ता रोको, गाव बंद केले. तसेच पोलिसांनाही निवेदन दिले. मात्र त्यानंतर दारू विक्री बंद झाली नाही. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठरावही  घेण्यात आला. मात्र दारू विक्रेत्यावर कोणताही फरक पडला नाही.  या पार्श्‍वभूमीवर महिलांना गावात अवैध दारू विक्री करणार्‍या विक्रेत्याने दारूचा साठा विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाली. यावेळी तीस ते चाळीस महिलांनी या विक्रेत्याच्या घरी जाऊन दारु विक्री करू नका म्हणून सांगितले. महिलांना खताच्या गोणित आणलेला देशी दारूचा साठा निदर्शनास पडताच संतप्‍त झालेल्या महिलांनी हा साठा हस्तगत करून देशी दारूच्या बाटल्या रस्त्यावर आणून फोडल्या. महिलांच्या या पवित्र्याने अवैध दारू विक्रेत्याचे धाबे दणाणले आहे. अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने महिलावर्गात रोष आहे. अवैध दारू विक्रेत्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महिलानी केली आहे. 

याबाबत घनसावंगीच्या पोलिस निरीक्षकांना निवेदनही देण्यात आले. या आंदोलनात सरपंच मनिषा शिंदे, राणी  शिंदे, मुक्‍ता शिंदे, रेश्मा शेख,  गंगाबाई शिंदे, शोभा शिंदे, राधाबाई शिंदे, गंगा उगले, कौशल्या सोनवणे, यांच्यासह 30 ते 40 महिला तसेच सुरेश शिंदे, गोविंद शिंदे, प्रदीप शिंदे, संतोष शिंदे, दत्तात्रय शिंदे, नारायण शिंदे आदी  सहभागी झाल्या होत्या.