Mon, Sep 16, 2019 05:29होमपेज › Jalna › कारच्या धडकेत विद्यार्थिनी ठार

कारच्या धडकेत विद्यार्थिनी ठार

Published On: May 26 2018 1:50AM | Last Updated: May 26 2018 12:01AMजालना : प्रतिनिधी

जालना-देऊळगाव रस्त्यावरील वाघ्रुळगावाजवळ ट्यूशनला जाणार्‍या विद्यार्थिनींना भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 1 विद्यार्थिनी ठार तर दोन जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी (दि. 25) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. जालना तालुक्यातील इंदलकरवाडी येथील राजश्री दत्तू शेळके (17) हिच्यासह अंजली वानखेडे, सीमा शिंदे, गीता इंदलकर या विद्यार्थिनी ट्यूशनसाठी वाघ्रुळकडे जात असताना पांढर्‍या रंगाच्या भरधाव इंडिगो कारने त्यांना पाठीमागून धडक दिली. 

यात राजश्री शेळके ही ठार झाली, तर अंजली वानखेडे व सीमा शिंदे या जखमी झाल्या. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मयत व जखमींना जालना सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. संजय शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिस ठाण्यात पांढर्‍या रंगाच्या इंडिगो कारचालकावरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कणखर हे करीत आहेत.