Sun, Aug 18, 2019 06:06होमपेज › Jalna › जिजाऊ चरणी लाखो शिवभक्‍त नतमस्तक

जिजाऊ चरणी लाखो शिवभक्‍त नतमस्तक

Published On: Jan 13 2019 1:36AM | Last Updated: Jan 13 2019 1:36AM
जालना :  प्रतिनिधी

माँ जिजाऊ यांच्या 421 व्या जयंतीनिमित्त शनिवारी सिंदखेडराजा येथील राजवाड्यावरील जन्मस्थळी अलोट जनसागर लोटला. पहाटेपासून लाखो शिवभक्‍तांनी राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेतले. माँ जिजाऊ यांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली. या कार्यक्रमास विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

शुक्रवारी राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर जिजाऊ जन्मस्थळी भव्य मशालयात्रा काढून मानवंदना देण्यात आली. यावेळी हजारो पणत्या व मेणबत्तींच्या प्रकाशाने जिजाऊ जन्मस्थळ उजळून निघाले. या यात्रेत मराठा सेवा संघाच्या महिला, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी हलगीच्या तालावर ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणा देण्यात आल्या. 

जन्मोत्सवानिमित्त मशालयात्रा काढण्यात आली. ही मशालयात्रा जन्मस्थळावरून ढोल-ताशांच्या गजरात निघाली. जिजाऊ सृष्टी येथे त्याचा समारोप करण्यात आला. या यात्रेत भगव्या पोशाखांमध्ये फेटे बांधून महिलाही सहभागी झाल्या होत्या. जन्मतोत्सवानिमित्त राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली. दरवर्षी 12 जानेवारी रोजी सिंदखेडराजात लाखो जिजाऊ भक्‍त एकत्र येत असतात. मात्र, यावर्षी 11 जानेवारी रोजीच सिंदखेडराजानगरी जिजाऊ भक्‍तांच्या गर्दीने फुलून गेली होती. शुभेच्छांचे बॅनर, पोस्टर झळकत होते. सिंदखेडराजा येथील आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांना पूजेचा पहिला मान मिळाला.

खा. संभाजी महाराज, खा. सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, आ. राजेश टोपे, सिंदखेडचे नगराध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, खा. प्रतापराव जाधव, पालकमंत्री मदन येरावार, आ. दिलीप सानंदा, चैनराज संचेती, जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ-पाटील  आदींनी जिजाऊंना अभिवादन केले.