होमपेज › Jalna › १३ लाख शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी अर्ज

१३ लाख शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी अर्ज

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जालना : प्रतिनिधी 

मराठवाड्यातील 13 लाख 10 हजार 272 शेतकर्‍यांनी 30 ऑगस्टपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेसाठी ऑनलाइन कर्जमाफीचे अर्ज दाखल केले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यात मराठवाड्यात जालना जिल्ह्याचा प्रथम क्रमांक  आहे. 

  राज्य शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेद्वारे ऑनलाइन कर्जमाफीसाठी अर्ज भरण्यास 24 जुलैपासून सुरुवात झाली.  त्यात मराठवाड्यात सर्वाधिक 2 लाख 16 हजार 851 ऑनलाइन अर्ज जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी भरले. जालना जिल्ह्यात अर्ज भरण्यासाठी 1 हजार 363 केंद्रांवर प्रशासनाच्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सततचा दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकर्‍यांना  शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडता येत नव्हते. त्यामुळे  कर्जाचा आकडा सतत फुगत असल्यामुळे जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत 58 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी, यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलन केले होते. त्यास राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला. विधिमंडळात कर्जमाफीवरून गदारोळामुळे सरकारने अखेरीस कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. त्यात एकाच घरात पती-पत्नीच्या नावावर वेगवेगळे कर्ज असले तरी कुटुंबातील एकाच व्यक्‍तीस कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीसाठी पात्र शेतकर्‍यांची नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी लावण्याबाबत शासन पातळीवर विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पात्र नसलेल्या लाभार्थ्याचे नाव यादीत आल्यास त्याची गावात चर्चा होणार आहे. कर्जमाफीचे अर्ज भरताना सर्व्हर जाम होणे, इंटरनेट कनेक्शन नसणे, आधार कार्डशी मोबाइल क्रमांक लिंक नसणे या व यासारख्या विविध कारणांमुळे शेतकर्‍यांना तासन्तास आपले सरकारसह इतर इंटरेट कॅफेसमोर उभे राहावे लागत आहे. प्रशासन अर्ज भरण्यासाठी शुल्क द्यावे लागणार नसल्याचे शेतकर्‍यांना सांगत असले तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे.

अर्जांची स्थिती अशी

जालना 2 लाख 16 हजार 851, औरंगाबाद 2 लाख 8 हजार 848, हिंंगोली 97 हजार 319, परभणी 1 लाख 11 हजार 530, बीड 1 लाख 81 हजार 394, उस्मानाबाद 1 लाख 19 हजार 170, लातूर 1 लाख 76 हजार 238, नांदेड 1 लाख 98 हजार 922 ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.