Fri, Apr 26, 2019 20:05होमपेज › International › बंगालच्या उपसागराजवळ चीन उभारणार बंदर; भारतासाठी चिंता 

बंगालच्या उपसागराजवळ चीन उभारणार बंदर; भारतासाठी चिंता 

Published On: Nov 09 2018 7:32PM | Last Updated: Nov 09 2018 7:32PMबिजिंग (चीन) : पुढारी ऑनलाईन

चीनने नवनवीन रणनिती आखून हिंदी महासागरात आपले वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत. आता चीन बंगालच्या उपसागराजवळ म्यानमारमध्ये मोठे बंदर उभारणार आहे. भारताच्या शेजारील देशांमध्ये चीनची वाढती गुंतवणूक भारतासाठी चिंतेची विषय ठरली आहे.

भारताच्या शेजारील देशांमध्ये चीन मोठे प्रकल्प उभारत आहे. आता तर चीन त्यांच्या महत्वाकांक्षी बेल्ट अॅन्ड रोड योजनेतर्गंत (बीआरआय) म्यानमारमधील क्याकप्यू शहराजवळील खोल समुद्रात बंदर उभारणार आहे. हे बंदर बंगाल उपसागराच्या बाजूला असणार आहे. 

चीनने म्यानमारमध्ये बंदर उभारणीसाठी नुकताच डील केली आहे. चीनचा भारताच्या शेजारील देशांमध्ये बंदर बनविण्याचा धडाका कायम आहे. याआधी चीनने पाकिस्तानमध्ये ग्वादर बंदर उभारले आहे. त्याशिवाय श्रीलंकेमधील महत्वाचे हंबनटोटा बंदर ९९ वर्षाच्या लीजवर चीनकडे आहे. विशेषत: चीन श्रीलंकेत मोठी गुंतवणूक करत आहे.  

बांगलादेशमधील चितगाव बंदर हे चीनने विकसित केले आहे. आता चीनने म्यानमारमध्ये गुंतवणूक वाढविण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या वाढत्या गुंतवणूकीच्या पार्श्वभूमीवर म्यानमार देखील चिंतेत आहे. यासाठी त्यांनी काही प्रकल्पावर नियंत्रण ठेवले असल्याचे समजते.

म्यानमारमध्ये उभारण्यात येत असलेल्या बंदर प्रकल्पात चीनची ७० टक्के आणि म्यानमारची ३० टक्के गुंतवणूक आहे, असे वृत्त आहे. चीन समुद्री मार्गाने जवळ असलेल्या देशांना कर्ज देऊन मोठे बंदर प्रकल्प उभारत आहे. चीन इतर देशांना कर्जे देऊन द्विपक्षीय राजकीय संकट निर्माण करत असल्याचा आरोप होत आहे.