होमपेज › International › इराणकडून होणाऱ्या तेल आयातीमध्ये भारताकडून मोठी कपात 

इराणकडून होणाऱ्या तेल आयातीमध्ये भारताकडून मोठी कपात 

Published On: Sep 14 2018 5:42PM | Last Updated: Sep 14 2018 5:38PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतीय तेल कंपन्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये इराणकडून होणारी तेल आयात वर्षाच्या सुरवातीच्या तुलनेत निम्म्यावर आणणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत झालेला अणुकरार रद्द केल्यानंतर पुन्हा आर्थिक निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. या निर्बंधाचा फायदा घेता यावा यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

भारताने इराणकडील तेल आयात २ कोटी ४० लाख बॅरलने कमी केली आहे. भारताकडून एप्रिल ते ऑगस्टपर्यंत अतिरिक्त तेलाची खरेदी करण्यात आली. इराणसोबत सन २०१५ मध्ये झालेल्या अणुकराराला ट्रम्प प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे इराणवर नव्याने आर्थिंक निर्बंध लादले जात आहेत. गेल्या महिन्यात त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादायला सुरवात केली आहे.

येत्या ४ नोव्हेंबरपासून अमेरिका इराणच्या पेट्रोलियम सेक्टरवर निर्बंध लादणार आहे. इराणकडून चीननंतर भारत सर्वांधिक तेल आयात करतो. भारत अमेरिकेने इराणवर लादत असलेल्या निर्बंधाकडे गंभीरतने घेत नसला तरी, दोन्ही देशांदरम्यान संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने भारतीय तेल कंपन्यांना नोव्हेंबरपासून तेल आयात कमी करण्याचा आदेश दिला होता.

दरम्यान, भारतासारखे देश संपूर्ण तेल आयातीवर विसंबून असल्याने अमेरिकेच्या निर्णयातून सवलत मिळू शकते पण आता आयात कमी करणे क्रमप्राप्त आहे. अमेरिकन संरक्षणमंत्र्याकडून त्याबाबतीत मागील आठवड्यामध्ये स्पष्ट सुतोवाच करण्यात आले होते.