Mon, Nov 20, 2017 17:21होमपेज › International › ड्रॅगनच्या विस्तारवादाला रोखायला हवे

ड्रॅगनच्या विस्तारवादाला रोखायला हवे

Published On: Nov 15 2017 2:23AM | Last Updated: Nov 15 2017 2:21AM

बुकमार्क करा

मनिला : पीटीआय

दहशतवादाच्या मुद्द्यासह चीनच्या विस्तारवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान परिषदेत थेट लक्ष्य केले. विस्तारवादाविरोधात आशियाई देशांनी एकत्रित लढा द्यायला हवा, असे स्पष्ट मत मोदी यांनी आशियान व्यासपीठावरून व्यक्‍त केले.

आसियान परिषदेनिमित्त मोदी फिलीपाईन्स दौर्‍यावर आहेत. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या विस्तारवादी भूमिकेबाबत आसियान गटातील 10 देशांनी चिंता व्यक्‍त केली आहे.  या परिषदेवेळी त्यांनी दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या विस्तारवादी भूमिकेला टार्गेट केले. ते म्हणाले की, आशियामध्ये आसियान संघटना सर्वाधिक प्रभावी आहे. आसियान विभागाच्या हितासाठी आणि शांततेसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. विस्तारवादाने कुणी अस्थिरता निर्माण करीत असल्यास सर्वांनी मिळून विस्तारवादी वृत्तीविरोधात उभे  ठाकले पाहिजे. आसियान देशांनी प्रादेशिक सुरक्षेबाबत नियमावली बनविण्याची गरज आहे. सुरक्षेबाबतच्या नव्या शिल्परचनेला भारताचा पाठिंबा असेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. आसियान देशांतील दहशतवादाविरोधात लढा उभा करण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचेही मोदी यांनी यावेळी नमूद केले. आसियान देशांच्या भारतासोबतच्या ऋणानुबंधांनाही मोदी यांनी यावेळी उजाळा दिला. भारतासह आसियान  देशांची लोकसंख्या 1 अब्ज 85 कोटी असून, जगाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांश आहे. भारतातील परकीय गुंतवणुकीमध्ये आसियान देशांचा वाटा 17 टक्के आहे. गेल्या 17 वर्षांत आसियान देशांमधून भारतासोबतच्या व्यापारात 70 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ झाली आहे.