Sun, Dec 08, 2019 06:15होमपेज › International › चीनमध्‍ये भूकंप; ११ जणांचा मृत्‍यू, १२२ जखमी

चीनमध्‍ये भूकंप; ११ जणांचा मृत्‍यू, १२२ जखमी

Published On: Jun 18 2019 12:49PM | Last Updated: Jun 18 2019 12:25PM
बिजिंग : पुढारी ऑनलाईन 

चीनच्‍या सिचुआन भागाला भूंकपाचा धक्का बसला आहे. या भूकंपात ११ लोकांचा मृत्‍यू तर १२२ लोक जखमी झाले आहेत. हा भूकंप सोमवारी (ता.१७ ) झाला आहे. चीनमधील सिचुआन भागात दोनवेळा भूकंपाचे धक्‍के बसल्‍याची माहिती तेथील स्‍थानिक माध्‍यमांनी दिली आहे. 

चीनमधील भूकंप केंद्राकडून (सीईएनसी) मिळालेल्‍या माहितीनुसार, ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्‍का मंगळवारी सकाळी बसला. सोमवारी रात्री ६.० रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा पहिल्या भूकंपाचा धक्‍का यिबिन शहरातील चांगिंग काउंटी येथे बसला होता. या संपूर्ण भागातून काही लोकांचा मृत्‍यू तर काही जखमी झाल्‍याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे. 

यिबिन शहरातील लोकांच्‍या मते, भूकंप झाल्‍यानंतर आर्धा तास भूकंपाचे धक्‍के जाणवत होते. भूकंप झाल्‍यानंतर या भागातील लोक घरातील कोपर्‍यात जावून बसले. भूकंपाची तीव्रता वाढली तसे लोक घराच्‍या बाहेर पडले. चेंग्दु येथील अर्ली वॉर्निंग सिस्टीमकडून भूकंप होण्‍याआधी एक मिनिट आधी लोकांना सतर्क केले होते. यानंतर एका मिनिटानंतर लोकांना भूकंपाचा धक्‍का जाणवला.  

चीनमध्‍ये बचाव कार्य सुरु आहे. स्‍थानिक माध्‍यामांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार चीनच्‍या सरकारकडून भूकंप झालेल्‍या भागात पाच हजार टेंट, १० हजार पलंग, २० हजार रजाई यासारख्‍या वस्‍तूंची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.