Sun, Apr 21, 2019 06:19होमपेज › International › भारत पहिल्यांदाच 'या' कारणासाठी तालिबानशी चर्चा करणार

भारत पहिल्यांदाच तालिबानशी चर्चा करणार

Published On: Nov 09 2018 10:58AM | Last Updated: Nov 09 2018 10:58AMमॉस्को (रशिया) : पुढारी ऑनलाईन 

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय सहभागी असलेल्या तालिबान या दहशतवादी संघटनेसोबत भारत पहिल्यांदाच अनौपचारिक बोलणी करणार आहे. भारताने या चर्चेला हिरवा कंदील दाखवला असला तरी  चर्चेचा केंद्रबिंदू हा अफगाणच असायला हवा ही अट भारताने घातली आहे. रशियाकडून आयोजित करण्यात आलेल्या शांतता चर्चेत भारत सहभागी होणार आहे. भारताकडून माजी राजनैतिक अधिकारी टी. आर राघवन आणि अमर सिन्हा शांतता चर्चेत प्रतिनीधीत्व करतील. 

ही बैठक रशियात आज (शुक्रवार) होणार आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांचे नेतृत्व आणि नियंत्रण हे अफगाणकडे असायला हवे असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले.  रशियातील मॉस्कोमध्ये होणाऱ्या या बैठकीला भारत उपस्थित राहणार असल्याने जागतिक स्तरावर  भुवया उंचावल्या आहेत. भारत 'अनौपचारिक' स्तरावर का असेना पण पहिल्यांदाच अफगानिस्तानबरोबर व्यासपीठावर एकत्र येणार आहे. अफगाणिस्तान सरकारच्या 'कम्फर्ट लेवल'चा पुर्ण विचार करून भारत सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले, की मॉस्कोमध्ये रशियन सरकार अफगाणिस्तानमधील शांततेसाठी बैठक घेत असत्याचे भारत सरकारला माहिती आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता, एकता, विविधता, सुरक्षा, आणि आनंद आणण्यासाठी सर्व प्रयत्नांचे भारत समर्थन करतो. या बैठकीत भारताचा सहभाग हा फक्त 'अनौपचारिक' स्तरावर असेल, असे ही कुमार यांनी सांगितले.