Tue, May 26, 2020 04:41होमपेज › Goa › जि. पं. निवडणूक आचारसंहिता जारी 

जि. पं. निवडणूक आचारसंहिता जारी 

Last Updated: Feb 22 2020 1:34AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक 22 मार्च रोजी निश्चित करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी राज्यभरात सर्वत्र शुक्रवारपासून (दि. 22 फेब्रुवारी)आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ही आचारसंहिता 23 मार्चपर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी 22 मार्च रोजी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दुसर्‍या दिवशी 23 मार्च रोजी मतमोजणी पार पडणार असून 25 मार्च रोजी नवीन जिल्हा पंचायत मंडळांना ताबा सुपूर्द करण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीचे मतदान मतपत्रिकेने होणार आहे. 

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी गुरुवार दि. 27 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करणार आहेत. 5 मार्च रोजी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हा पंचायत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 27 फेब्रुवारीपासून सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज निर्वाचन अधिकार्‍यांकडे सादर करावेत.नंतर निर्वाचन अधिकार्‍यांकडे दाखल झालेल्या अर्जांची 6 मार्च रोजी छाननी केली जाणार आहे. 7 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. जिल्हा पंचायत निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना अर्जासोबत पाचशे रुपये अनामत रक्कम शुल्क भरावे लागणार आहे. तर अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व महिला उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत तीनशे रुपये अनामत रक्कम शुल्क भरावे लागणार आहे. या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी एकूण 6 कोटी रुपये खर्च होणार आहे, असे निवडणूक आयुक्त श्रीवास्तव यांनी सांगितले. 

या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 15 निर्वाचन अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. उत्तर गोव्यासाठी 6 व दक्षिण गोव्यासाठी 9 निर्वाचन अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. जिल्हा प्रशासकीय पातळीवरील उपजिल्हाधिकारी व मामलतदारांकडे ही जबाबदारी सुपूर्द करण्यात येणार आहे. दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयात ही निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. राज्यभरात एकूण 1237 मतदान केंद्रे असून उत्तर गोव्यात 641 व दक्षिण गोव्यात 596 मतदान केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक निर्वाचन अधकारी, तीन कारकून, एक शिपाई व दोन पोलिस शिपाई मिळून 7 जणांची नियुक्ती केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी एकूण 9 हजार कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. निर्वाचन अधिकार्‍यांपासून पोलिसांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पाचशे कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी एकूण 8,29,876 मतदारांची संख्या आहे. उत्तर गोव्यात 4,18,225 मतदार असून दक्षिण गोव्यात 4,11,651 मतदारांची संख्या आहे. त्यापैकी उत्तर गोव्यात 2,04,230 पुरूष मतदार व 2,13,995 महिला मतदारांची संख्या आहे. दक्षिण गोव्यात 2,00041 पुरूष मतदार असून 2,11,610 महिला मतदारांची संख्या आहे. या दोन्ही जिल्ह्यांत 21334 महिला मतदारांची संख्या जास्त आहे. तसेच उत्तर गोव्यात सर्वाधिक 22505 मतदार सुकूर मतदारसंघात आहेत. सर्वांत कमी 14196 मतदार पाळी मतदारसंघात आहेत. दक्षिण गोव्यात सर्वाधिक 23286 मतदार सांकवाळ मतदारसंघात आहेत. सर्वांत कमी मतदार 11344 मतदार उसगांव मतदारसंघात आहेत.

राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने पूर्ण 33 टक्के राखीवता ठेवली आहे. अनुसूचित जाती 2 टक्के, अनुसूचित जमाती 12 टक्के व इतर मगासवर्गीयांसाठी 19 टक्के राखीवता ठेवण्यात आली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या 50 मतदारसंघांपैकी एकूण 31 मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत. अनुसूचित जातींसाठी 1, अनुसूचित जमातींसाठी 6 त्यापैकी 2 महिलांना राखीव, इतर मागासवर्गीयांसाठी 14 त्यापैकी 5 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या सार्वत्रिक आढाव्यात एकूण 17 मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय जनरल मतदारसंघात 10 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी जिल्हा पंचायत निवडणुकीचा कार्यभार सांभाळणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जिल्हाधिकारीच जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी निर्वाचन अधिकार्‍यांची निवड करणार आहेत. तसेच निवडणूक भरारी पथकेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार आहेत. 
जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर होणार आहे. ही निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना निवडणूक खर्च म्हणून 5 लाख रुपये खर्च करता येणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीय पातळीवर मतदारसंघात करण्यात आलेला खर्च संबंधित राजकीय पक्षांच्या उमेदवाराच्या नावावर जमा धरण्यात येणार आहे.

दक्षिण गोवा राखीव जागा
दक्षिण गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी अनुसूचित जातीसाठी एकही जागा राखीव नाही. अनुसूचित जमातीसाठी 5 जागा, त्यापैकी 2 जागा महिलांसाठी राखीव. इतर मागास वर्गीयांसाठी 6 जागा राखीव, त्यापैकी 2 जागा महिलांसाठी राखीव. तर जनरल मतदारसंघात 5 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

उत्तर गोवा राखीव जागा
उत्तर गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 1 जागा अनुसूचित जाती, 1 जागा अनुसूचित जमाती, 8 जागा इतर मागासवर्गीय त्यापैकी 3 जागा महिलांसाठी राखीव. जनरल मतदारसंघात 5 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.