Sun, May 31, 2020 16:08होमपेज › Goa › चारित्र्याच्या संशयावरून बाणावलीत तरूणीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून बाणावलीत तरूणीचा खून

Last Updated: Apr 26 2020 1:02AM

संग्रहित छायाचित्रमडगाव : पुढारी वृत्तसेवा

चारित्र्याच्या संशयावरून जेनिफर गोन्साल्वीस (वय 24, कोंब- मडगाव) या तरूणीचा मेलबर्न रॉड्रिग्ज (22, माझीलवाडा-बाणवली) या तिच्या प्रियकराने बाणावली येथील मोंतहिल परिसरात गळा आवळून खून केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आला. याप्रकरणी तातडीने तपासकार्य करून कोलवा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत संशयित मेलबर्न रॉड्रिग्जला अटक केली.

कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या प्रेयसीचे दुसर्‍याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन संशयिताने हे कृत्य केले असून शुक्रवारी संध्याकाळी मोंतहिल येथील मोबाईल टॉवर असलेल्या जागी काहींना बनियनच्या सहाय्याने युवतीचा गळा आवळलेल्या अवस्थेत पडलेला मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मेलबर्न रॉड्रिग्ज हा शुक्रवारी दुपारी कोंब मडगाव येथे जेनिफर गोन्साल्वीस हिच्या घरी तिला न्यायला आला होता. दुपारी मेलबर्न सोबत गेलेली मुलगी रात्रीपर्यंतही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी दोघांनाही मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर जेनिफरचे नातेवाईक फ्रान्सिस रॉड्रीग्स यांनी पोलिस स्थानकात जेनिफर बेपत्ता असल्याची तक्रार नोंद केली.

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी कोलवा पोलिसांना अज्ञातांकडून बाणावली येथे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासकामास सुरवात केली. यावेळी कोलवा पोलिसांना फातोर्डा पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक अमीन नाईक यांनी जेनिफर ही युवती बेपत्ता असल्याच्या तक्रारीची माहिती दिली. तपासाला गती देऊन पोलिसांनी तक्रारदाराला मृत जेनिफरचा फोटो दाखवला असता, त्याने तो ओळखला आणि पोलिसांना दुपारपासून घडलेल्या सर्व गोष्टींची माहिती दिली.

रात्री उशिरा कोलवा पोलिसांनी मेलबर्न याला अटक केली. प्रेयसीचे दुसर्‍याशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन खून केल्याचे संशयिताने कबूल केले असून बनियनच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी संशयित मेलबर्न रॉड्रिग्ज याला अटक करुन त्याच्याविरुद्ध भा.दं.सं.च्या 302 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलिस उपअधीक्षक सेराफिन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली कोलवा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी फातोर्डा पोलिस निरीक्षक कपिल नायक याच्या सहाय्याने या प्रकरणाचे तपासकाम केले. याप्रकरणी कोलवा पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी जेनिफरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.