Sun, Apr 21, 2019 06:19होमपेज › Goa › ‘वर्ल्ड पॅनोरमा’ विभागात यंदा 67 चित्रपट

‘वर्ल्ड पॅनोरमा’ विभागात यंदा 67 चित्रपट

Published On: Nov 08 2018 1:24AM | Last Updated: Nov 08 2018 1:24AMपणजी : प्रतिनिधी

49 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) यंदा सर्व विभागातील मिळून एकूण 212 चित्रपट प्रदर्शित केले जाणार असून इफ्फीतील ‘वर्ल्ड पॅनोरमा’ विभागात एकूण 67 चित्रपट असून ऑस्करसाठी नामांकन  झालेले तब्बल 15 चित्रपटही विभागात संबंधित देशांकडून प्रदर्शित केले जाणार आहेत. 

‘वर्ल्ड पॅनोरमा’मधील  चार चित्रपटांचे इफ्फीत ‘वर्ल्ड प्रीमियर’, दोन चित्रपटांचे ‘आंतरराष्ट्रीय प्रीमियर’, पंधरा चित्रपटांचे ‘एशिया प्रीमियर’ तर साठ चित्रपटांचे इंडिया प्रीमियर होणार आहे. ‘कॅलिडोस्कोप’ विभागातील बहुतेक चित्रपट विविध पुरस्कार विजेते असून यात 22 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.  

‘होमेज’ विभागात चित्रपट क्षेत्रातील दिवंगत व्यक्‍तींना आदरांजली वाहिली जाणार आहे. यंदा या विभागात स्व. शशी कपूर, श्रीदेवी, एम. करुणानिधी व कल्पना लाजमी यांना तर  आंतरराष्ट्रीय होमेज विभागात टेरेंन्स मार्श, मिलोस फॉर्मन व एन. व्ही. कोट्स यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. 

महोत्सवात खुल्या ठिकाणावर ओपन एअर स्क्रिनिंग देखील असणार आहे. खेलो इंडिया अंतर्गत क्रिडा बायोपिक्स विभागही ठेवण्यात आला असून यात ‘गोल्ड’, ‘भाग मिल्का भाग’, ‘मेरी कॉम’, ‘1983’, ‘महेंद्र सिंग धोनी अनटोल्ड स्टोरी’ व ‘सुरमा’  हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. युनॅस्को गांधी मेडल विभागात युनेस्को च्या विचारधारेवर आधारित व प्रतिष्ठित युनेस्को पुरस्कार प्राप्त दहा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.   

‘वाईल्ड स्ट्रॉबेरीज’ ने ‘मास्टर्स रेट्रॉस्पेक्टिव्ह’ विभागाची सुरूवात

इफ्फी त  ‘मास्टर्स रेट्रॉस्पेक्टिव्ह’ विभागात इंगमार बर्गमन यांचे सर्वोत्कृष्ट सात चित्रपट दाखविण्यात येतील. यात बर्गमन यांच्या जीवनावर आधारित माहितीपट ‘बर्गमन आयलँड’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या विभागाची सुरूवात 21 नोव्हेंबर रोजी आधी चर्चासत्र व त्यानंतर बर्गमन यांच्या ‘वाईल्ड स्ट्रा्रॅबेरीज’ या चित्रपट प्रदर्शनाने होणार आहे. 

अभिनेता अर्जुन कपूर, वरुण धवन मास्टरक्‍लासमध्ये 
पणजी : मनाली प्रभुगावकर

49 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) यंदा चित्रपट क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्‍तींचे मास्टरक्‍लास व चर्चासत्रे असतील. यात इफ्फी 2018 चे जीवनगौरव पुरस्कार विजेते  डॅन वॉल्मन, अभिनेता अर्जुन कपूर, वरुण धवन, अनिल कपूर, अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्याशी  मास्टरक्‍लासमध्ये संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.   

महोत्सवात  प्रसून जोशी, स्रिकर प्रसाद, सुमित इजरानी, बोनी कपूर, डेविड धवन, रोहित धवन, जयराज, कौशिक गांगुली, शाजी करूण, श्रीजीत मुखर्जी, श्रीधर आणि श्रीराम राघवन, अनुपमा चोप्रा, राजीव मसांड, भावना सोमय्या, जॅसन हॅफोर्ड, मेघना गुलझार, लीना यादव, गौरी शिंदे यांनाही  मास्टरक्‍लास विभागात ऐकण्याची संधी मिळणार आहे.  इफ्फीत दिव्यांग मुलांसाठी खास  विभाग ठेवण्यात आला असून यात  दिव्यांग मुलांना  ऑडिओ च्या माध्यमातून वर्णन सांगणारा चित्रपट दाखविण्यात येईल. यात ‘हिचकी’ व ‘शोले’ हे दोन चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. 

इफ्फीत यंदा प्रथमच  ‘स्क्रॅच ऑन स्क्रीन’ हा नवीन विभाग  असून यात अ‍ॅनिमेटेड  चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या विभागात  भारतीय स्टुडिओच्या सहकार्याने तीन आंतरराष्ट्रीय फिचर लेंथ चित्रपट प्रदर्शित करण्यात येतील. तसेच यंदा टुनिशियन चित्रपटांचे खास चित्रिकरण करण्यात येणार आहे. 

5 हजार प्रतिनिधींची नोंदणी 

49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आतापर्यंत  5 हजारहून अधिक प्रतिनिधींनी नाव नोंदणी केली आहे. इफ्फीसाठी नाव नोंदणीसाठी 15 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. प्रतिनिधींसाठी नोंदणी शुल्क 1 हजार रुपये असून  15 नोव्हेंबर नंतर नावनोंदणी करणार्‍यांना 300 रुपये विलंब शुल्क  आकारले जाईल. सध्या दाखल झालेल्या काही अर्जांमध्ये  त्रुटी असल्याने  तसेच काही अर्ज अपूर्ण असल्याने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. या अर्जांची नीट छाननी केल्यानंतर अर्जांना मान्यता देण्यात येईल,असे सांगण्यात आले.