Thu, May 28, 2020 05:31होमपेज › Goa › कांद्याचे दर तीन दिवसांत कमी न केल्यास आंदोलन

कांद्याचे दर तीन दिवसांत कमी न केल्यास आंदोलन

Last Updated: Dec 07 2019 2:17AM
पणजी ः प्रतिनिधी
फलोत्पादन महामंडळाने पुढील तीन दिवसांत कांद्याचे दर कमी न केल्यास  गोवा प्रदेश महिला काँग्रेसतर्फे सरकार व महागाईच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून काँग्रेसच्या महिला सर्व मतदारसंघात जाऊन कांद्याची विक्री करणार असल्याचे प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.  गोवा प्रदेश महिला काँग्रेसतर्फे टोंका-करंझाळे येथील फलोत्पादन कार्यालयासमोर कांद्याच्या दरवाढीच्या निषेधार्थ धरणे धरण्यात आली. त्यावेळी अ‍ॅड. कुतिन्हो पत्रकारांशी बोलत होत्या.

पणजीच्या मार्केटमध्ये किरकोळ कांदा प्रति किलो 200 रुपये असून मडगावच्या मार्केटात प्रति किलो 170 रुपये आहे. सध्या नाताळ व नवीन वर्षारंभ जवळ पोहचलेला असून हे उत्सव साजरा करताना खानपानात अधिक कांदा लागणार आहे.  लोकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करुन देणे सरकारचे कर्तव्य आहे. काँगे्रस सरकारच्या कारकीर्दीत कांदा प्रती किलो 70 रुपये झाला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी लोकांना प्रति किलो 30 रुपये दराने कांदा उपलब्ध केला होता. भाजपाच्या सरकारने फलोत्पादनाच्या गाळ्यांवर सवलतीने प्रति किलो 30 रुपये दराने कांदा लोकांना द्यावा. त्यावरील नुकसान सरकारने सोसावे, असे कुतिन्हो म्हणाल्या.

या फलोत्पादन महामंडळाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात गैरकारभार चालू आहे. या महामंडळाचे वार्षिक लेखा परीक्षण केले जात नसून गेल्या आठ वर्षांपासून वितरकांची एकही बैठक घेण्यात आलेली नाही. फलोत्पादन महामंडळाचा कारभार पारदर्शक ठेवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली राज्यात एकेकाळी नारळाचे दर वाढले होते. त्यावेळी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी शहरे व प्रत्येक मतदारसंघात जाऊन स्वस्त किंमतीत नारळांची विक्री केली होती. सरकार तीन दिवसांत लोकांना कांदा स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यास अपयशी ठरल्यास महिला काँग्रेस रसत्यावर उतरून लोकांना स्वस्त दरात कांद्याची विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फलोत्पादनच्या गेटला निदर्शकांकडून टाळे

राज्यात कांदा दरवाढीच्या निषेधार्थ फलोत्पादन महामंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार्‍या महिला काँग्रेसच्या समर्थकांना प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडविल्यामुळे काँग्रेसच्या समर्थक महिला संतप्त बनल्या. महिला प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली महिलांना फलोत्पादनाच्या लोखंडी गेटला टाळे ठोकले. नंतर जादा पोलिसांची फौज बोलावून घेतली. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात काँग्रेसच्या महिलांना आत प्रवेश दिला. त्यानंतर महिला काँग्रेसच्या समर्थकांनी फलोत्पादन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक संदीप फळदेसाई यांना घेराव घालून कांदा दरवाढीच्या निषेधार्थ प्रश्न विचारले.

कांदा 60 रुपयांनी देण्याचा प्रयत्न ः फळदेसाई

कांद्याचे पीक घेणार्‍या  बेळगांव, हुबळी, सांगली, कोल्हापूर आदी भागात झालेल्या अवकाळी अतिवृष्टीमुळे कांदा जमिनीतच कुजलेला असून कांद्याचे उत्पादन  तीस ते चाळीस टक्क्यांनी  घटलेले आहे. गोव्याला त्या भागातूनच कांद्याचा पुरवठा होतो. या कारणामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून कांद्याचे दर वाढलेले आहे. फलोत्पादन महामंडळाचा त्यात दोष नाही. तरी महामंडळातर्फे लोकांना लवकरच स्वस्त दरात  कांदा उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप फळदेसाई यांनी सांगितले. गोवा प्रदेश महिला काँग्रेसने कांद्यांची समस्या सोडविण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे.प्रति किलो 30 रुपये दराने कांदा उपलब्ध करुन देण्याची त्यांची मागणी आहे.या मागण्या पूर्ण करणे शक्य नाही. मात्र, या समस्येबाबत सरकारशी बोलणी केली जाणार आहे. तसेच फलोत्पादन महामंडळातर्फे पुढील 7 दिवसांत ही समस्या सोडविली जाणार असून प्रति किलो 60 रुपये दराने कांदा लोकांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.