Wed, May 27, 2020 18:52होमपेज › Goa › ‘एलईडी’ मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी यंत्रणा उभारणार : मंत्री रॉड्रिग्स

‘एलईडी’ मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी यंत्रणा उभारणार : मंत्री रॉड्रिग्स

Last Updated: Feb 20 2020 2:29AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा
खुल्या समुद्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर ‘एलईडी’ आणि ‘बुल ट्रॉलिंग’ मासेमारीविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी राज्य सरकारकडे पुरेशी यंत्रणा अस्तित्वात नाही. यासाठी बंदर कप्तान खाते, भारतीय तटरक्षक दल आणि किनारी पोलिस आदी यंत्रणेसोबत चर्चा करून 15 दिवसात अशी यंत्रणा स्थापन करणार असल्याचे मत्स्योद्योग खात्याचे मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनी बुधवारी सांगितले. 

सामान्यांसाठी मासळींचा दुष्काळ पडू नये म्हणून सरकारने समुद्रातील ‘एलईडी’ आणि ‘बुल ट्रॉलिंग’वर बंदी घातली आहे. मात्र, अशी बंदी असूनही अनेक ट्रॉलर्स बेकायदेशीरपणे ‘एलईडी’ आणि ‘बुल ट्रॉलिंग’मध्ये गुंतले असल्याचा दावा करून पारंपरिक मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी बुधवारी मंत्री रॉड्रिग्स यांची पणजीत भेट घेतली. सदर भेटीनंतर मंत्री रॉड्रिग्स पत्रकारांशी  बोलत होते.  मत्स्योद्योग  खात्याकडे अशा ट्रॉलर्सना पकडण्यासाठी यंत्रणा नसल्याचे त्यांनी कबूल केले. ते म्हणाले, की हे ट्रॉलर्स जप्त करण्यास आणि बेकायदेशीर मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मत्स्योद्योग खाते सक्षम नाही. ‘एलईडी’ आणि ‘बुल ट्रॉलिंग’ला आळा घालण्यासाठी आम्हाला बंदर कप्तान खाते, भारतीय तटरक्षक दल आणि किनारी पोलिस आदी यंत्रणचे सहकार्य आवश्यक आहे. लवकरच  इतर यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी बैठक घेणार आहे.    

राज्यातील जेटीवर अनेक मच्छीमारांनी बेवारस सोडून देण्यात आलेल्या बोटींमुळे उपद्रव व अडचण निर्माण होत असल्याचेही पारंपरिक मच्छीमारांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मंत्री रॉड्रिग्ज म्हणाले, की मत्स्योद्योग  खाते अशा बोटींची ओळख पटवून सदर मालकांना त्या बोटीं हटण्यासाठी नोटिसा बजावणार आहेत. त्यानंतर सदर मालकाला आपली बोट नेण्यासाठी काही काळ अवधी देणार असून तरीही दुर्लक्ष होत असल्यास या बोटी सरकार ताब्यात घेणार आहेत.