Tue, May 26, 2020 08:14होमपेज › Goa › मित्र पक्ष, अपक्षांना दूर करणार नाही

मित्र पक्ष, अपक्षांना दूर करणार नाही

Published On: May 29 2019 2:09AM | Last Updated: May 30 2019 1:33AM
पणजी : प्रतिनिधी

राज्य विधानसभेच्या पटलावर भाजपचे स्थान आणखी बळकट झाले आहे. मात्र, आघाडीतील मित्र पक्षांना व अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा कोणताही विचार नाही. आम्हाला आजही युती पक्षांचे साहाय्य हवे असल्याचे स्पष्ट मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्‍त केले. पर्वरी येथील  विधानसभा  संकुलात नवनिर्वाचित चार आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना सावंत म्हणाले की, भाजप आघाडी सरकार आपल्या सहकारी गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदारांच्या सहकार्याने उर्वरित कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण करणार आहे. 

मुख्यमंत्री बनल्यानंतर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पहिली मंत्रिमंडळ बैठक सावंत यांना घेता आलेली नाही. याविषयी विचारले असता ते म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक 4 जून रोजी घेतली जाणार आहे. आचारसंहितेनंतर राज्याच्या प्रशासनाची घडी बसवणे, खोळंबलेली  मान्सूनपूर्व कामे मार्गी लावणे, सरकारी विकासकामांची गती वाढवणे, खाणबंदी उठवणे, म्हादई आदी कामांना प्राधान्य देणार आहे.     

नुकत्याच पार पडलेल्या चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीतील निकालामुळे 40 सदस्यीय राज्य विधानसभेतील भाजपचे संख्याबळ 14 वरून 17 वर पोचले आहे. भाजप आघाडीला गोवा फॉरवर्डचे तीन, अपक्ष तीन, मगोपचा एक धरून एकूण 24 आमदारांचा पाठिंबा आहे. काँग्रेसचे 14 आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार जमेस धरता विरोधकांच्या बाजूने 15 आमदार आहेत. मगोचे एकमेव आमदार सुदिन ढवळीकर यांनी भाजप आघाडीला दिलेला पाठिंबा अजून काढून घेतलेला नाही. मगोच्या पाठिंब्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, सावंत म्हणाले की, मगोने अजून तरी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला नाही. मगोचा कोणत्याही अटीविना आपल्याला पाठिंबा असल्यास तो मागे घेण्यासंबंधी आपण त्यांना का विचारू?

खाणी पुन्हा सुरू होण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत. त्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन होऊन खाण मंत्रालय कोणाला मिळते ते समजणे आवश्यक आहे. केंद्रीय खाण मंत्र्यांना या विषयाची माहिती देऊन त्यांना घेऊनच पंतप्रधानांना भेटणे अधिक संयुक्तीक ठरेल, असे मत सावंत यांनी व्यक्त केले. 

पंतप्रधान मोदींच्या शपथविधीचे आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 30 मे रोजी दिल्लीत शपथविधी होणार असून या कार्यक्रमाला आपणाला तसेच पक्षातील मंत्री व महत्वाच्या पदाधिकार्‍यांना आमंत्रण देण्यात आलेले आहे. त्या दिवशी पक्षश्रेष्ठींकडे कोणताही विषय मांडता येणार नाही. खा. श्रीपाद नाईक यांना याआधी राज्य मंत्रिपद मिळाले असून आता कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळावे , असे सर्व गोमंतकीयांसह आपल्यालाही वाटत आहे. नाईक यांना आताही चांगले स्थान मिळेल , अशी आशा असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन जुलैमध्ये

राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन कमी कालावधीचे नसून दोन आठवड्याचे तरी असण्याची शक्यता आहे. अधिवेशनाची नेमकी तारीख निश्‍चीत करण्याआधी सरकारातील घटक पक्षांना, अपक्ष आमदारांना तसेच विरोधी पक्षनेत्यांनाही विश्‍वासात घेतले जाणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.