Wed, May 27, 2020 04:26होमपेज › Goa › भाजप उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवू नका

भाजप उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवू नका

Published On: Feb 26 2019 1:16AM | Last Updated: Feb 26 2019 8:59AM
पणजी : प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी बी. एल. संतोष यांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना आगामी मांद्रे पोटनिवडणुकीत भाजपच्या विरोधात निवडणूक रिंगणात न उतरण्याचे आवाहन  सोमवारी केले. याबाबत पार्सेकर यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. 

मांद्रेचे काँग्रेसचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना भाजपमध्ये ऑक्टोबर-2018मध्ये प्रवेश केला होता. यामुळे  रिक्‍त  झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार असून त्यासाठी भाजपतर्फे दयानंद सोपटे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे मांद्रेचे माजी आमदार पार्सेकर यांनी सोपटे यांच्या उमेदवारीला स्पष्ट विरोध करून आपल्यालाच भाजपची उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली होती. मांद्रे मतदारसंघात आपल्याला भाजप उमेदवारी न मिळाल्यास  सोपटे यांच्याविरुद्ध निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे पार्सेकर यांनी जाहीर केले होते.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी राज्यात आलेले  गोवा प्रभारी बी. एल. संतोष  यांनी सोमवारी भाजपच्या गाभा समिती  सदस्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेतला. या बैठकीत पार्सेकर हजर राहिले असता त्यांच्याशी संतोष यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. भाजपच्या उमेदवाराविरूद्ध निवडणूक न लढवण्याची विनंती संतोष यांनी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.