Wed, May 27, 2020 17:36होमपेज › Goa › मंत्री सरदेसाईंच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

मंत्री सरदेसाईंच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

Published On: May 15 2019 1:51AM | Last Updated: May 14 2019 10:47PM
मडगाव ः प्रतिनिधी 
नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई सोनसड्याची पाहणी करून करून लगेच विदेशात रवाना झाल्याने मडगाव नगरपालिकेने त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.आठ दिवसांत विहिरी साफ करण्याचे आदेश सरदेसाई यांनी पालिकेला दिले होते, आणि मुख्यधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी विहिरींच्या सफाईला सुरुवात केल्याचे उत्तर सरदेसाई यांना दिले होते.पण प्राप्त माहितीनुसार पालिका क्षेत्रातील 121 विहिरींपैकी केवळ चारच विहिरी साफ करण्यास पालिकेला यश आले असून पालिकेने सरदेसाई यांच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या आठवड्यात सोमवारी सरदेसाई यांनी सोनसड्याला भेट दिली होती.पावसाळ्यापूर्वी सोनसड्यावर कामांना सुरुवात करा, असा आदेश देताना लोकवस्तीत पावसाळ्यात रोगराई पसरण्या पूर्वी सर्व विहिरींची साफसफाई करावी तसेच पाणी स्वच्छ करणारे गप्पी मासे पाण्यात सोडावेत, असे आदेश त्यांनी दिले होते. त्यासाठी पालिकेला आठ दिवसांचा अवधी दिला होता. सरदेसाई यांनी कामांचा आढावा घेण्यासाठी पुन्हा शुक्रवारी सोनसड्यावर भेट दिली असता मुख्याधिकारी नाईक आणि नगराध्यक्ष बबिता आंगले यांनी विहिरींच्या सफाईला सुरुवात केल्याचा दावा सरदेसाई समोर केला होता.शुक्रवारी सरदेसाई विदेशात रवाना झाले होते.पालिकेकडून विहिरींच्या सफाईचा आढावा घेतला असता आतापर्यंत सोनसड्यावरील 4 विहिरी साफ केल्या असून शहरातील 121 विविरी अद्याप साफ करणे,बाकी असल्याचे समोर आले आहे. मान्सूनपूर्व कामासाठी सध्या पालिकेची धावपळ सुरू असून मान्सूनपूर्व कामे रखडण्यामागे पालिका निवडणूक आचार संहितेचे निमित्त पुढे करत आहे. 

मडगाव पालिका क्षेत्रात एकूण 25 प्रभाग असून प्रत्येक प्रभागतील 5 विहिरी साफ करण्याचे काम पालिका दरवर्षी हातात घेते. गेल्या आठवड्यापासून मडगाव नगरपालिकेने शहरातील विहिरी साफ करण्याचे काम हातात घेतले आहे. या कामांची सुरुवात सोनसड्यावरील विहिरींपासून करण्यात आली होती.गेल्या अकरा दिवसांपासून पालिकेला सोनसडा परिसरातील केवळ चारच विहीरी साफ करता आलेल्या आहेत.जून महिना अवघ्या पंधरा दिवसांवर आलेला असून राज्यात कधीही मान्सून दाखल होऊ शकतो. विहिरी साफ करण्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात रोगराई पसरण्याची भीती मडगाव वासीय व्यक्त करू लागले आहेत.

पालिका अभियंते मनोज आर्सेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पर्यंत चार विहिरीचे काम पूर्ण झाले आहे लवकरच अन्य विहिरी साफ करण्यात येतील. अन्य मान्सून पूर्व कामे करण्यासाठी पालिकेचे 30 कामगार कार्यरत आहेत. अन्य कामे आउटसोर्स करण्यात आलेली आहेत. सद्या आचारसंहिता लागू असल्याने कंत्राट मंजूर करता येत नाही. मात्र आचार संहिता उठल्यावर ही सर्व कामे केली जाणार आहे. विहिरीचे काम पूर्ण होताच त्यात पाणी स्वच्छ करणारी कप्पी मासळी घालण्यात येणार आहेत.

मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक पुढारीशी बोलताना म्हणाले की, पालिका मान्सूनपूर्व कामांना पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करत असून विविरीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने ही सर्व काम कामे पूर्ण करण्यात येतील असे नाईक म्हणाले. 

गप्पी मासे उपलब्ध करण्यासाठी पत्रव्यवहार

शहरातील 125 विहिरी स्वच्छ झाल्यावर 600 पेक्षा जास्त विहिरीत गप्पी मासळी सोडली जाणार आहे. हे मासे लवकर उपलब्ध करून घ्यावे यासाठी अर्बन हेल्थ सेंटरकडे पत्र पाठविण्यात आले आहे,अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.