Tue, May 26, 2020 08:25होमपेज › Goa › 'गोव्यातील दोन्ही जागा भाजप जिंकणार'

'गोव्यातील दोन्ही जागा भाजप जिंकणार'

Published On: Apr 08 2019 4:05PM | Last Updated: Apr 08 2019 4:05PM
पणजी : प्रतिनीधी

राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या तीन पोटनिवडणुका आणि लोकसभेच्या दोन्ही निवडणुका भाजप जिंकणार आहे. प्रचाराच्या दुसऱ्या फेरीची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 तारखेच्या जाहीर सभेने होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील प्रचार फेरी सुरु होणार आहे. सगळीकडे भाजपचे वातावरण असून केंद्रात देखील पुन्हा मोदी सरकार सत्तेत येईल,असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा 10 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्याची माहिती देण्यासाठी पणजी येथील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, सरचिटणीस सदानंद तानावडे, नगर विकासमंत्री मिलिंद नाईक उपस्थित होते.

खासदार तेंडुलकर म्हणाले, श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये सभा घेतली जाणार आहे. स्टेडियममध्ये 15 हजार आणि बाहेर मंडप घालून 10 हजार लोक बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मोदी यांच्या प्रचार सभेसाठी प्रत्येक मतदारसंघातून हजार ते दीड हजार कार्यकर्ते मोदी यांच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. मोदी यांच्या सभेनंतर कार्यकर्ते दुप्पट जोमाने कामाला लागतील आणि मोठ्या मताधिक्क्याने भाजपच्या उमेदवारांना निवडून आणतील.

 राज्यात निवडणूकांच्या प्रचाराची दूसरी फेरी पूर्ण झाली आहे. तिसऱ्या फेरीत प्रत्येक मतदार संघात मेळावा आणि जाहीर सभा होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले, सध्याची परिस्थिती बघितली तर आम्ही पाचही निवडणूक शंभर टक्के जिंकू यात शंका नाही.

उत्तर गोव्यात भाजपच्या विरोधात असलेल्या उमेदवारामध्ये दम नसल्याचे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले, दक्षिण गोव्यात नरेंद्र सावईकर हे सक्रिय असून त्यांनी खासदार निधी म्हणून लोकांची अनेक कामे केली आहेत. काँग्रेसला उमेदवार सापडत नसल्याने गेल्यावेळी ज्याला उमेदवारी नाकारली होती. त्यालाच उमेदवारी द्यावी लागली आहे. सावईकर यांनी आपला निधी शंभर टक्के खर्च करून आपली कार्यक्षमता सिद्ध केलेली आहे.

लोकसभेबरोबर विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये देखील भाजपचे पारडे जड असल्याचे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले,विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस आणि इतर विरोधक संभ्रमात आहेत.मांद्रे,शिरोडा आणि म्हापसा मधून भाजपचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील यात शंका नाही.लोकांना स्थिर सरकार हवे आहे.फक्त भाजपचे स्थिर सरकार देऊ शकत असल्याने मतदार आमच्यावर विश्वास दाखवत आहेत.

ख्रिश्चन मतदार नेहमीच भाजप सोबत आहेत.सबका साथ सबका विकास हे आमचे ध्येय आहे.त्यामुळे सासष्टि मधील सुज्ञ मतदार देशाचे हित बघून भाजपला यावेळी देखील साथ देत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यावेळी स्पष्ट केले.