Wed, May 27, 2020 04:33होमपेज › Goa › उच्च न्यायालयाच्या नोटिसीबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणार : लोबो

उच्च न्यायालयाच्या नोटिसीबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणार : लोबो

Published On: Apr 25 2019 1:43AM | Last Updated: Apr 25 2019 12:24AM
पणजी : प्रतिनिधी

महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाच्या दोन आमदारांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आपल्याला नोटीस बजावली आहे. याविषयी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन नोटिसीला उत्तर देणार असल्याची माहिती गोवा विधानसभेचे सभापती मायकल लोबो यांनी बुधवारी दिली. 

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळात आहेत. या दोघांनी  27 मार्च रोजी मध्यरात्री 2 वाजता मगो पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी  दोन तृतीयांश बहुमत सोबत असल्याने मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करीत असल्याचे पत्र सभापती मायकल लोबो यांना   सादर केले होते. त्यानुसार या विलीनीकरणाला 27 मार्च रोजीच सभापतींनी मान्यता दिली होती.

 याबाबत लोबो म्हणाले, की  महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन-तृतीयांश सदस्यांच्या संमतीने   पक्ष   भारतीय  पक्षात विलीनीकरणाला दिलेली मान्यता  हा निर्णय  भारतीय घटनेतील तरतुदीनुसार घेण्यात आला आहे. कायद्यात जे काही नमूद आहे त्यानुसारच आम्ही काम केले आहे. कायद्यात कोणत्याही राजकीय पक्षाच्या दोन-तृतीयांश विधीमंडळ गट सदस्यांनी  संमती दिल्यास   दुसर्‍या पक्षात विलीनीकरणाला मान्यता आहे. 

उच्च न्यायालयाने पाठविलेल्या नोटिसीवर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाच्या अनुभवी कायदेतज्ज्ञांशी आम्ही चर्चा करणार आहोत. या प्रकरणी न्यायालयात आमची बाजू आम्ही मांडणार आहोत. आमची बाजू योग्य असल्याचा आम्हाला विश्‍वास आहे, असा दावा लोबो यांनी व्यक्‍त केला.