Thu, May 28, 2020 19:55होमपेज › Goa › कोरोना चाचणीसाठी दीड कोटींचे यंत्र खरेदी करणार : आरोग्यमंत्री

कोरोना चाचणीसाठी दीड कोटींचे यंत्र खरेदी करणार : आरोग्यमंत्री

Last Updated: May 16 2020 1:11AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील कोरोना संशयित रुग्णांची तातडीने व जलदगतीने तपासणी करण्यासाठी सुमारे 1.50 कोटी रुपये किमतीचे आधुनिक ‘अब्बोट एम-2000 पीसीआर’ यंत्र खरेदी करण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्य खात्याला संमती दिली आहे. या यंत्राद्वारे कोरोनाची चाचणी पाच मिनिटांत करणे शक्य असून 24 तासांत 480 चाचण्या घेता येतात. या यंत्रामुळे राज्यातील चाचणी करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून सदर यंत्र खरेदी करायला गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळानेही मान्यता दिल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले. 

राणे म्हणाले की, राज्यात प्रवेश करणार्‍या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जलद चाचणी यंत्राची आवश्यकता आहे. चाचणीचा अहवाल लवकर मिळत नसल्याने लोकांना वाट पाहत रहावे लागत असल्याने प्रशासनाने नवीन यंत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाबत चाचणीचा जलद अहवाल मिळण्यासाठी ‘ट्रु नेट’चाही वापर करण्यात येत आहे. ‘ट्रु नेट’ चाचण्या करण्याची यंत्रणा दोन्ही जिल्हा इस्पितळांत आणि तीन उपजिल्हा इस्पितळांतही उभारली जाणार आहे. ‘ट्रु नेट’ चाचण्यांमुळे कोरोना संशयिताचा अहवाल तात्काळ मिळत असला तरी खात्री करण्यासाठी नमुने गोमेकॉच्या प्रयोगशाळेतही पाठवावे लागतात. प्रयोगशाळेतून अहवाल येण्यास किमान 4 ते 5 तास वेळ लागण्याची शक्यता असते. राज्यात दरदिवसा सरासरी 400 ‘ट्रु नेट’ आणि ‘पीसीआर’चाचण्या घेतल्या जात आहेत. राज्यात कोरोनासंबंधी गुरुवारपर्यंत 6200 चाचण्या झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.