Wed, May 27, 2020 11:06होमपेज › Goa › काँग्रेसने सरकार स्थापल्यास पाठिंबा : चर्चिल आलेमाव

काँग्रेसने सरकार स्थापल्यास पाठिंबा : चर्चिल आलेमाव

Published On: Oct 21 2018 2:17AM | Last Updated: Oct 21 2018 12:18AMपणजी : प्रतिनिधी

भाजपचे ठराविक मुद्दे व निर्णय आपल्याला पटतात. त्यामुळे त्यांना समर्थन दिले आहे. मात्र, भाजपात जायचा काही विचार नाही. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष असून ते सरकार स्थापन करत असल्यास आपण त्यांना पाठिंबा देणार, असे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी स्पष्ट केले. पणजीत एका पत्रकार परिषदेनंतर आलेमाव यांनी पत्रकारांशी राजकीय घडामोडींवर संवाद साधला. 

आलेमाव म्हणाले की, आपल्याला फक्त मतदारसंघात विकासकामे झालेली पाहिजेत. भाजप सरकारने काही विषय जबाबदारपणे हाताळले आहेत. त्यामुळे आपण मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला पाठिंबा दिला. आपला पाठिंबा हा पक्षाच्या विषय व समस्या हाताळण्याच्या कार्यपद्धतीवर अवलंबून आहे. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, त्यामुळे काँग्रेसचा सरकार स्थापण्याचा विचार असल्यास आपण पाठिंबा देणार आहे. 

भाजपमध्ये प्रवेश करणार का? या प्रश्‍नावर आलेमाव यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगितले. आपले विषय व समस्या सोडविणार्‍यांसोबत आपण कायम असू, असे त्यांनी सांगितले. मांद्रे व शिरोडा मतदारसंघात आगामी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात उतरविणार का? या प्रश्‍नाला उत्तर देताना आलेमाव म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी पोटनिवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा केली जाईल. त्यांना उमेदवार ठेवणे योग्य वाटल्यास एनसीपी जरूर निवडणूक लढवणार. आमच्याकडे  अनेक उमेदवार असून योग्यवेळी निर्णय घेणार, असे आलेमाव यांनी स्पष्ट केले.