Mon, May 25, 2020 02:56होमपेज › Goa › खाणप्रश्‍नी थोडी कळ सोसा : मुख्यमंत्री

खाणप्रश्‍नी थोडी कळ सोसा : मुख्यमंत्री

Published On: Jul 18 2019 1:57AM | Last Updated: Jul 18 2019 1:57AM
पणजी : प्रतिनिधी  

राज्यातील खाण व्यवसाय बंद असल्याने लोकांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे, त्याची सरकारला जाणीव आहे. खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकार गंभीर आहे. ऑक्टोबरपर्यंत खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वेळ महत्त्वाचा आहे. इतकी वर्षे थांबले आहेत, गोमंतकीयांनी आणखी थोडा काळ कळ सोसावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी  विधानसभा  अधिवेशनात  राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवर उत्तर देताना केले.

  मुख्यमंत्री सावंत म्हणाले, केंद्रीय एमएमडीआर कायद्यात दुरूस्तीपासून  गोवा मायनिंग लिड एबॉलिशन अ‍ॅक्ट (मायनिंग लिज 1987) पर्यंत आवश्यक सर्व पर्याय विचारात घेऊन खाणप्रश्‍न सोडवण्यासाठी  सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांकडे चर्चा, बैठकाही सुरू आहेत. खाणींचा ई लिलाव लवकरच  केला जाणार असून खाण डंप विषयांवरही चर्चा झाल्या आहेत. खाण डंप संदर्भातही लवकरच निर्देश दिले जातील.  

खाण कंपन्यांनी कामावरून काढून टाकलेल्या कामगारांच्या संख्येविषयी माहिती घेतली जात आहे. त्या कामगारांना रोजगार देण्यासाठी काही पर्याय सापडतो का याचा अभ्यास केला जाईल. या आठवड्यात खाण विषयावर केंद्र सरकारची आणखी एक बैठक होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या काही दिवसांत खाण व्यवसायासंबंधी  नेमका निर्णय  होेईल,  असेही  त्यांनी सांगितले. 
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्यात नोकर्‍यांची उणीव असल्याने रोजगार निर्मितीसाठी काय करता येईल,याबाबत विचार व  प्रयत्न सुरू आहेत. उद्योग मंत्री विश्‍वजित राणे हे नवीन औद्योगिक वसाहती राज्यात आणण्यासाठी पावले उचलत आहेत. या प्रयत्नातून रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. 

राज्यात कौशल्य विकास  आधारीत शिक्षण देण्यासाठी सरकारने सुरूवात केली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) हा त्यासाठी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. दहावी, बारावी नंतर शिक्षण घेण्यात रुची नसणार्‍या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम आयटीआय मध्ये उपलब्ध आहेत. आणखीही खूप बदल शिक्षण क्षेत्रात होणार आहेत.राज्यातील पेडणे तालुक्याकडे आजवर मागासलेला म्हणून पाहण्यात आलेले आहे. मात्र, आता पेडण्यात मोपा विमानतळ व आयुषचे इस्पितळ होणार आहे. त्यामुळे पेडण्याला विशेष महत्त्व व ओळख मिळणार आहे. पेडणे आता मागासलेले राहणार नाही. लोकांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन  मुख्यमंत्र्यांनी केले.

गोवा ३१ ऑगस्टपर्यंत ओडीएफमुक्‍त   

गोवा राज्य 31 जुलै पर्यंत हागणदारीमुक्‍त (ओडीएफ) करणार, असे  या आधी सरकारने सांगितले होते. मात्र, यासाठी काही प्रकल्प हाती घेण्यात आले असल्याने 30 ऑगस्टपर्यंत राज्य हागणदारीमुक्‍त घोषित केले जाईल. स्वच्छ भारत अंतर्गत ही मोहिम सुरू असून यासाठी आणखी एका महिन्याचा वेळ आवश्यक आहे. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत गोवा हागणदारीमुक्‍त राज्य घोषित केले जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.