Mon, Sep 16, 2019 05:35होमपेज › Goa › सीमेवरील मासळी आयातीबाबत नियमावली

सीमेवरील मासळी आयातीबाबत नियमावली

Published On: Dec 10 2018 1:11AM | Last Updated: Dec 10 2018 12:42AM
पणजी : प्रतिनिधी

राज्याच्या सीमेपासून 60 कि.मी. अंतरातील  छोट्या मासळी व्यावसायिकांना आयात बंदी शिथिल करून दिलासा देणार आहोत, मात्र या सवलतीचा लाभ घेऊन काही घाऊक मासळी विक्रेते मोठ्या प्रमाणात मासळीची आयात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार सतर्क असून सदर सवलतीबाबतची नियमावली  तयार करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. मासळी समस्येवर तोडग्यासाठी सोमवारी (दि.10) उच्चस्तरीय बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मासळी व्यावसायिकांनी एफडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असल्याने गोव्यात सध्या मासळीची आयात काही प्रमाणात सुरू झाली आहे. घाऊक प्रमाणात मासळी येण्यास सुरुवात झाली आहे. लहान होड्यांमधून मासळी पकडणार्‍यांना या बंदीतून मोकळीक देण्याबाबत विचार सुरू आहे. यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याबाबत सोमवारी मुख्य सचिव, आरोग्य खात्याचे सचिव, पोलिस महासंचालक व एफडीएचे अधिकारी यांची बैठक बोलावण्यात आली आहे, असे  राणे यांनी सांगितले. 

काही मासळी विक्रेते एफडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असल्याचे दाखवून चुकीच्या पद्धतीने मासळी आयात करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जणांकडे घाऊक मासळी विक्रीचा परवाना नसतानाही मासळी आयात करण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा लोकांबाबत कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. मात्र, छोट्या मासळी व्यावसायिकांना मोकळीक देताना काही चुकार व्यापार्‍यांकडून या सेवेचा गैरफायदा घेतला जाऊ नये, यासाठी आपण काळजी घेणार आहे. घातक  रसायनयुक्त मासळीची आयात   झाल्यास नंतर जनता सरकारलाच दोष देण्याची भीती आहे. कर्नाटकचे मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनाही आपण संपर्क साधून सरकारच्या सावधगिरीच्या धोरणाबाबत माहिती दिली आहे. घाऊक मासळी व्यापार्‍यांनीही सरकारला स्वच्छ आणि निरोगी मासळी राज्यात येण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राणे यांनी केले.