Tue, May 26, 2020 04:39होमपेज › Goa › वेर्णा-कुठ्ठाळी जंक्शनची आज पुन्हा पाहणी

वेर्णा-कुठ्ठाळी जंक्शनची आज पुन्हा पाहणी

Published On: Jan 02 2019 1:56AM | Last Updated: Jan 02 2019 12:26AM
पणजी : प्रतिनिधी

पणजी ते मडगाव महामार्गावरील कुठ्ठाळी जंक्शनवरून वाहतूक वळवण्याच्या प्रश्‍नाबाबत मंत्री आणि अधिकारी बुधवारी (दि.2) दुसर्‍यांदा पाहणी करणार आहेत. पर्यायी मार्गाबाबतचा तोडगा काढण्यासाठी दि. 7 रोजी नौदल अधिकार्‍यांसोबत होणार्‍या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे वाहतूक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री  सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. आल्तिनो येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

ढवळीकर म्हणाले की, नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, आमदार एलिना साल्ढाणा यांच्यासमवेत रविवारी कुठ्ठाळी भागातील पर्यायी मार्गाची पाहणी करण्यात आली. मात्र  स्थानिक शेतकर्‍यांच्या असहकार्यामुळे महामार्गालगतच्या शेतातून तात्पुरता रस्ता  तयार करून वाहतूक वळवण्याचा पर्याय सरकारने सोडून दिला आहे. आता सदर मंत्रिगण बुधवारी 3 वाजता या भागाची पाहणी करून दुसरा काही पर्याय  काढता येईल, का हे  पाहणार   आहेत. याशिवाय, नौदलाकडूनही मदत मिळवण्यासाठी 7 जानेवारी रोजी बैठक घेतली जाणार आहे. 

विद्यमान सरकार हे गरीब आणि शेतकर्‍यांचे हित जपणारे आहे. यामुळेच केवळ 50 कोटी रुपयात कुठ्ठाळी मार्गावरून  राष्ट्रीय महामार्ग उड्डाण पूल बांधणे शक्य असताना उड्डाणपूल उभारून रस्ता करण्यासाठी 250 कोटींचा खर्च करण्यास सरकार तयार झाले आहे. कुठ्ठाळी जंक्शनवरून पर्यायी मार्ग काढण्याबाबत सत्ताधारी भाजप आघाडी सरकारच्या सदस्यांमध्ये कोणताही वाद नाही. मंंत्री सरदेसाई यांना पर्यायी मार्ग पसंत नसेल तर त्यांचे मन वळवण्याचे काम केले जाणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.