Thu, May 28, 2020 20:18होमपेज › Goa › पणजी महापौरपदी मडकईकर

पणजी महापौरपदी मडकईकर

Published On: Mar 14 2019 2:04AM | Last Updated: Mar 14 2019 2:04AM
पणजी : प्रतिनिधी

पणजी मनपा महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक न लढविण्याचा  निर्णय भाजप गटाने घेतला आहे. त्यामुळे बाबूश मोन्सेरात गटाचे महापौरपदाचे उमेदवार उदय मडकईकर व उपमहापौरपदाचे उमेदवार पास्कॉल मास्कारेन्हस यांची बिनविरोध  निवड निश्‍चित झाली आहे. याची अधिकृत घोषणा गुरुवारी होणार आहे.

पणजी मनपाच्या सभागृहात  सकाळी नवनियुक्त  महापौर व उपमहापौराच्या नावाची घोषणा केली जाईल. त्यानंतर  स्थायी तसेच अन्य समित्यांची निवड केली  जाणार आहे.

मनपा महापौरपदासाठी  मोन्सेरात  गटाचे  उदय मडकईकर व उपमहापौरपदासाठी पास्कॉल मास्कारेन्हस यांनी  बुधवारी उमेदवारी अर्ज सादर केले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी  संध्याकाळ 4 वाजे पर्यतंची मुदत होती. मात्र, मडकईकर व मास्कारेन्हस यांच्याविरोधात कुणीच अर्ज सादर न केल्याने या दोघांची वरील दोन्ही पदांसाठी निवड निश्‍चित  झाली आहे.

 मडकईकर म्हणाले की,  पणजी नव्या मार्केटमधील  दुकाने बेकायदेशीरपणे  भाडेपट्टीवर देण्यात आली आहे. सदर विषय  मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून तो मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जाईल. मार्केटचे वीज  बिल  कोट्यवधी रुपयांच्या घरात पोहचले असून  मार्केट मधून मनपाला  हवा तसा महसूल देखील येत नसून काही प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 याशिवाय  पणजी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा समस्या गांभीर्याने विचारात घेतली जाईल. प्रभागवार नगरसेवकोची बैठक घेऊन कचरा विल्हेवाटी संदर्भात चर्चा केली जाईल त्यांनी  सांगितले.