Tue, Sep 17, 2019 04:12होमपेज › Goa › वाहतूक नियमभंग टिपणार्‍या मोबाईल अ‍ॅपचे उद्या लोकार्पण

वाहतूक नियमभंग टिपणार्‍या मोबाईल अ‍ॅपचे उद्या लोकार्पण

Published On: Nov 14 2018 1:43AM | Last Updated: Nov 14 2018 12:11AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील रस्त्यावरील वाहनचालकांकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन आता थेट ऑनलाईन नोंदवता येणार असून त्यासाठी गोवा पोलिस खात्याने विशेष ‘अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप’ बनविले आहे.  या अ‍ॅपचे लोकार्पण राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते गुरुवारी (दि.15) होणार आहे, अशी माहिती  पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी दिली. 

गोवा सेन्टीनल योजना सुरू केल्यास एक वर्ष पूर्ण होत आहे. एका वर्षाच्या आढाव्यानंतर ही योजना खूप फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे. कारण मागील 10 महिन्यांत रस्ता अपघातांची संख्या आणि अपघाती मृत्यूंची संख्याही 22 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे ही सेवा आणखी सक्षम आणि सहज हाताळण्याजोगी करण्यासाठी नवीन अ‍ॅप लोकांना दिले जाणार असल्याचे मुक्तेश चंदर यांनी सांगितले.  सदर नवीन अ‍ॅप हे विशेषत: राज्यात ‘ट्रफीक सेन्टीनल ’ म्हणून वाहतुकीची उल्लंघने रोखण्यासाठी वावरणार्‍यांसाठी बनविण्यात आले आहे. एखादे उल्लंघन सेन्टीनलने आपल्या मोबाईलद्वारे टिपले की लगेच ते अ‍ॅपवर अपलोड करण्याची सुविधा त्यात उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस खात्याच्या वाहतूक विभागाकडून  वाहतूक उल्लंघनांची तत्काळ नोंदणी होऊन त्यावर कारवाईची पत्रेवजा चलने संबंधित वाहनाच्या मालकाला पाठविणे शक्य होणार आहे. विद्यमान परिस्थितीत ‘ट्रॅफीक सेन्टीनल’ मार्फत टिपण्यात आलेली उल्लंघने पोलिस खात्याच्या वाहतूक विभागाला ‘ई-मेल’ किंवा ‘व्हॉटस्अ‍ॅप’च्या माध्यमातून पाठवावी लागत आहेत. या उल्लंघनांची नंतर छाननी करणे, अधिक उल्लंघने पाठविणारा ‘उत्कृष्ट सेन्टीनल’ ठरविणे  आदी कामे करण्यासाठी खूप वेळ जात होता. यापुढे अ‍ॅपवरच त्याची माहिती मिळणार असल्याने वाहतूक विभागाचाही वेळ वाचणार आहे. पणजी पोलिस मुख्यालयात गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता  एका विशेष समारंभात हे अ‍ॅप लोकांसाठी खुले करून दिले जाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिली. 


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex