Tue, May 26, 2020 09:08होमपेज › Goa › खाती वाटपाबाबत उद्या निर्णयाची शक्यता

खाती वाटपाबाबत उद्या निर्णयाची शक्यता

Published On: Oct 11 2018 1:17AM | Last Updated: Oct 11 2018 12:13AMपणजी : प्रतिनिधी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी भाजपचे चार मंत्री तसेच घटक पक्षातील मगोचे नेते सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई, अपक्ष आमदार रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि प्रसाद गावकर यांना दिल्लीत ‘एम्स’मध्ये  बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीतच मुख्यमंत्र्यांकडील काही खात्यांचे वाटप करण्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी याआधीच पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रीच्या कालावधीत  आपल्याकडील खात्यांचे वाटप करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, येत्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता ‘एम्स’मध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सूत्रांनी नमूद केले. 

भाजपचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, वीज मंत्री निलेश काब्राल आणि नगरविकास मंत्री मिलींद नाईक यांना शुक्रवारी दिल्लीत बोलावण्यात आले आहे. याशिवाय , सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, कृषी मंत्री विजय सरदेसाई हे अनुक्रमे मगो आणि गोवा फॉरवर्डतर्फे सहभागी होणार आहेत.या दोन्ही पक्षातील अन्य मंत्री या बैठकीला जाणार नाहीत. अपक्ष आमदार तथा महसूल मंत्री रोहन खंवटे आणि कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे हेही  एम्स मधील बैठकीला हजर राहणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे सध्या दिल्लीत असून तेही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.