Thu, May 28, 2020 20:31होमपेज › Goa › पत्र मागे न घेतल्यास पाण्यासाठी युद्ध

पत्र मागे न घेतल्यास पाण्यासाठी युद्ध

Last Updated: Dec 16 2019 1:18AM
पणजी : प्रतिनिधी
म्हादई बचाव आंदोलन काँग्रेसतर्फे आणखी तीव्र केले जाणार असून जनतेच्या चळवळीचे काँग्रेस नेतृत्व करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सकारात्मक तोडग्याच्या आणि पर्यावरणमंत्री जावडेकर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार येत्या दोन दिवसांत म्हादईबाबत सकारात्मक तोडगा न काढल्यास पाण्यासाठी युद्ध सुरू करावे लागेल, असा इशारा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिला. गोव्याची जीवनदायिनी असलेली म्हादई वाचवण्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा देण्याची आमची तयारी आहे, असेही ते म्हणाले.

गोवा प्रदेश काँग्रेसतर्फे दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर म्हादईप्रश्‍नी रविवारी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हादई नदीचे पाणी वळवण्यासाठी परवानगी दिल्याच्या निषेधार्थ धरणे आणि निर्दशने करण्यात आली. त्यावेळी कामत बोलत होते.

काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्ली पोलिसांमार्फत म्हादईसंबंधी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कामत यांनी भाषणात सांगितले की, भाजपचे केंद्रीय आणि राज्य सरकार म्हादईबाबत असंवेदनशील बनले आहे. यामुळे भाजप नेत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसला देशाच्या राजधानीत येऊन आंदोलन करावे लागले. 

गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, कर्नाटक राज्यातील पोटनिवडणुकीत फायदा मिळावा म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नेते अमित शहा यांच्याशी संगनमत करून म्हादईचा बळी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या मंत्रालयात सुरू असलेल्या बेकायदा कृत्यांना पाठीशी घालून सर्वोच्च न्यायालयात म्हादईबाबत सुनावणी सुरू असताना असे निर्णय घेतले आहेत. म्हादईचे पाणी कर्नाटकाने वळविल्यास राज्याचे फक्त पर्यावरण नष्ट होणार नसून पिण्याचे पाणीही मिळणे दुरापास्त होणार आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस लुईझिन फालेरो यांनी सांगितले की, भाजप सरकार हुकूमशाहीच्या मार्गावरून जात आहे. भाजप देशातील सर्व संस्था, भाषा, धर्म, नद्या आणि अन्य गोष्टी राजकीय लाभासाठी नष्ट करत चालले आहे. 

दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडताना सांगितले की, केंद्रातील भाजप सरकार गोवा आणि गोमंतकीयांच्या रास्त व न्याय्य मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करत आले आहे. म्हादईसंदर्भातील अन्यायाबाबत आपण संसदेत विषय मांडणार आहे. 

महिला प्रदेश अध्यक्षा अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो, युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, मेघश्याम राऊत, दशरथ मांद्रेकर, युवा गटाध्यक्ष ग्लेन काब्राल यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारकडून गोव्याची जीवनदायिनी म्हादईच्या हिताचे संरक्षण व्हावे, अशी मागणी केली. सूत्रसंचालन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केले. 

दिल्लीतील जंतरमंतरवर रविवारी झालेल्या म्हादईप्रश्‍नी धरणे आंदोलनात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी नेतृत्व केले. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, सचिव खेमलो सावंत, सेवादलचे अध्यक्ष शंकर किर्लपालकर, व इतर शेकडो काँग्रेस समर्थकांनी जंतरमंतरवर बॅनर आणि फलक घेऊन धरणे आंदोलनात भाग घेतला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘म्हादई बचाव, गोवा बचाव’; ‘हमारी म्हादई, मारी माँ हमे चाहिए’ घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. 

पोलिस प्रमुखांकरवी पंतप्रधानांना निवेदन
दिल्लीतील जंतरमंतरवरील धरणे आंदोलन झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढला. दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा अडविल्यानंतर गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी स्थानिक पोलिस प्रमुखांना पंतप्रधानांना देण्यासाठी निवेदन सादर केले. या निवेदनात म्हादईसंबंधी सर्वोच्च न्यायालयात तसेच म्हादई जलतंटा लवादासमोर खटला सुरू असताना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून कर्नाटक राज्यातील पोटनिवडणुकीत लाभ मिळावा म्हणून दिलेल्या परवाना पत्राचा निषेध करून सदर पत्र मागे घेण्याची मागणी केली. गोवा राज्य हे पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील विभागात येत असून राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष असताना त्यात म्हादईचे पाणी वळवू दिल्यास राज्याचे वाळवंट होईल, असा इशारा दिला. जागतिक तापमानवाढीचा राज्याला थेट फटका बसताना पुढील शतकात गोवा समुद्राच्या पाण्याखाली जाण्याचा धोकाही या पत्रात अधोरेखित केला असल्याची माहिती गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.