Wed, May 27, 2020 06:00होमपेज › Goa › स्कार्लेट खून : सॅमसनला दहा वर्षे सश्रम कारावास

स्कार्लेट खून : सॅमसनला दहा वर्षे सश्रम कारावास

Published On: Jul 20 2019 2:08AM | Last Updated: Jul 21 2019 1:23AM
पणजी : प्रतिनिधी

गोव्यात गाजलेल्या ब्रिटिश युवती स्कार्लेट किलिंग हिच्या खूनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आरोपी सॅमसन डिसोझा याला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर त्याला 2.60 लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला.डिसोझा याला न्यायालयाने 17 जुलै रोजी दोषी ठरवून निवाडा राखून ठेवला होता. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. तर या प्रकरणातील दुसरा संशयित प्लासिडो कार्व्हालो याला न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष ठरवले होते.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. डी. धनुका व पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने शुक्रवारी डिसोझा याला शिक्षा सुनावली. शिक्षेवर युक्‍तिवाद करून सीबीआयचे वकील अ‍ॅड. खान म्हणाले की, आरोपी सॅमसन डिसोझा याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. न्यायालयाने त्याला कुठलीही दया दाखवू नये, खुनासारख्या गंभीर प्रकारचे गुन्हे करणार्‍यांना कठोर संदेश जाणे आवश्यक आहे.

नुकसानभरपाईबाबत युक्‍तिवाद करताना सीबीआयचे वकील अ‍ॅड. खान यांनी सांगितले की, पीडित स्कार्लेट ही विदेशी युवती होती. त्यामुळे तिच्या आईला न्याय मिळवण्यासाठी परकीय देशात फार अचडणींना सामोरे जावे लागले. हे विचारात घेऊन त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत आदेश द्यावा. आरोपी सॅमसन डिसोझा याचे वकील अ‍ॅड. शैलेंद्र भोबे यांनी शिक्षेसंदर्भातील सीबीआयच्या युक्‍तिवादाला विरोध केला.    

डिसोझा हा घरातील एकमेव कमावता आहे. त्याला सुधारण्यास एक संधी द्यावी, अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावून आरोपी डिसोझा याला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
सदर स्कार्लेट खून प्रकरण 2008 सालचे आहे. 15 वर्षीय ब्रिटिश युवती स्कार्लेट ही गोव्यात आपल्या आई व भावंडासह सुटी घालवण्यासाठी आली होती. काही दिवसांनंतर तिची आई फियोना मॅकोव्हन व भावंडे स्कार्लेट हिला गोव्यात ठेवून अन्य राज्यात गेले होते.

फेब्रुवारी 2008 मध्ये स्कार्लेटचा मृतदेह हणजूण किनार्‍यावर आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयने स्कार्लेट हिच्यावर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी स्थानिक सॅमसन डिसोझा व प्लासिडो कार्व्हालो यांच्यावर आरोप ठेवला होता. मात्र 2016 साली गोवा बाल न्यायालयाने या दोन्ही संशयितांना निर्दोष मुक्‍त केले होते. या निवाड्याला सीबीआयने फेब्रुवारी 2017 मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.