Mon, May 25, 2020 13:26होमपेज › Goa › ताळगाव सरपंचपदी आग्‍नेल दा कुन्हा, उपसरपंचपदी रेघा पै

ताळगाव सरपंचपदी आग्‍नेल दा कुन्हा, उपसरपंचपदी रेघा पै

Published On: Apr 30 2019 1:55AM | Last Updated: Apr 30 2019 1:55AM
पणजी : प्रतिनिधी

ताळगाव पंचायतीसाठी सरपंच म्हणून आग्‍नेल दा कुन्हा आणि उपसरपंचपदावर रेघा सुनील पै यांची निवड करण्यात आली आहे. ताळगाव भागात सुसज्ज कचरा प्रकल्प स्थापणे, रस्ते दुरुस्ती व विकास प्रकल्प राबवणे आदी कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी सांगितले. 

ताळगाव पंचायतीत ‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट पॅनेल’तर्फे उभे करण्यात आलेले सर्व अकराही सदस्य जिंकून आल्यानंतर आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी पत्रकारांना सांगितले की, आपण पहिल्या दिवसापासून आपले पॅनेल सर्व जागा जिंकणार असल्याचे सांगत होते. ताळगाववासीयांनी आपले शब्द खरे केल्याबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानत आहे. आता आम्ही सर्व पंचायत सदस्य एकत्र बसून पुढील विकासासाठी विचारविनिमय करून निर्णय घेऊ. 

सरपंच आग्‍नेल दा कुन्हा यांनी सांगितले की, ताळगाववासीयांची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाल्याबद्दल आपल्याला आनंद वाटत आहे. ताळगावच्या विकासासाठी अनेक नवकल्पना आमच्याकडे असून त्याविषयी ताळगाववासीयांना लवकरच माहिती दिली जाणार आहे. पंचायतीचा महसूल वाढवण्याबाबत काही आराखडे तयार करण्यात येत असून निधीसाठी आम्ही सरकारवर अवलंबून राहू इच्छीत नाही. 

उपसरपंच रेघा पै म्हणाल्या की, आमची एक चांगली टीम बनली असून सर्व सदस्य एकसंधपणे सहकार्य देतील. ‘कचरामुक्त हरित ताळगाव’ बनण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. सर्वात आधी नवा कचरा प्रकल्प स्थापण्यास आम्ही प्राधान्य देऊ.