Wed, Apr 01, 2020 15:04होमपेज › Goa › पणजीत  लॉकडाऊनची  काटेकोर  अंमलबजावणी

पणजीत  लॉकडाऊनची  काटेकोर  अंमलबजावणी

Last Updated: Mar 25 2020 11:06PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर  राज्यात सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून  घरातून विनाकारण बाहेर जाणार्‍यांना तसेच दुकाने उघडण्यार्‍यांना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद दिला जात आहे. मेरशी येथे बुधवारी भुसारी दुकान अर्धवट खुले ठेवून सामानाची विक्री करणार्‍याला पोलिसांनी लाठीमार करून समज देऊन दुकान बंद करण्यास भाग पाडले. यासंदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे.  

देशभरासह गोव्यात देखील 21 दिवसांच्या लॉकडाऊनला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन पाळला जात आहे का याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक  नाक्यावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. रस्त्यावरुन  वाहतूक गायबच झाली आहे.  रस्ते सामसूम बनले असून लोक पोलिसांच्या भीतीने घरात बसून राहत आहेत.  रस्त्यावरुन जाणारी दुचाकी तसेच चारचाकी वाहने थांबवून त्यांची चौकशी केली जात आहे. वाहन क्रमांक नोंद केले जात आहेत. कुठे जात आहेत, कशाला जात आहेत याची चौकशी केली जात असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास वाहनचालकांना परत पाठवले जात असल्याचे बुधवारी दिसून आले.  त्याचबरोबर ज्या वाहन चालकांनी मास्क घातलेले नाही, त्यांना मास्क परिधान करा, असे आवाहन करताना दिसले.   याशिवाय पोलिसांकडून चारचाकी तसेच दुचाकीवरून देखील गस्त घातली जात आहे. याशिवाय  जे लोक समज देऊन देखील ऐकत नाहीत, त्यांना  पोलिसांकडून लाठीचा प्रसाद  दिला जात आहे.  या लॉकडाऊनच्या काळात सर्व दुकाने बंद ठेवण्याचे कठोर निर्देश देण्यात आले आहेत. मात्र  असे असून देखील काहींनी   दुकाने खुली करण्याचा प्रयत्न  केल्याने त्यांना पोलिसांकडून लाठी प्रसाद मिळाला. मेरशी येथे  च एका भुसारी दुकानदार अर्धे शटर खुले करून त्यातून सामानाची विक्री करीत होता. दुकान खुले  केल्याचे समजताच काही लोकांनी सामान खरेदी करण्यासाठी दुकाना समोर गर्दी केली होती.   मात्र याची माहिती मिळताच गस्ती वरील पोलिसांनी दुकानाजवळ जाऊन तेथून लोकांना पिटाळून लावले. पोलिसांना पाहून यावेळी  लोकांनी तेथून पळ काढला. दुकानदाराला समज देत त्याच्यावर लाठीमार केला. यासंदर्भातील व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर  व्हायरल झाला असून त्याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे.  

कर्फ्यू पासेसचे वितरण नाहीच

गोमंतकीयांना बुधवारी गुढी पाडव्याच्या दिवशी सणही साजरा करण्याचा उत्साह नसल्याचे आढळले. साध्या चहासाठी दुधाचाही देखील पुरवठा झालेला नव्हता. काही भागात  औषधालये खुली असली तरी रस्त्यावर पोलिसांच्या असलेल्या  कडक पहार्‍यामुळे लोकांना फिरण्यासही मोकळीक मिळत नव्हती. केंद्र  सरकारच्या  मार्गदर्शक  तत्वांना हरताळ फासून माध्यम प्रतिनिधींनाही राज्यात फिरण्यास आडकाठी केली जात होती. माध्यम प्रतिनिधींसाठी ‘कर्फ्यू पासेस’ देण्याची सोय बुधवार सायंकाळपर्यंतही झाली नसल्याने प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधींना मनस्ताप सहन करावा लागला होता.