Wed, May 27, 2020 05:28होमपेज › Goa › वेळ्ळीसह चार गटसमित्या बरखास्त करणार

वेळ्ळीसह चार गटसमित्या बरखास्त करणार

Published On: Jul 16 2019 1:55AM | Last Updated: Jul 16 2019 1:55AM
मडगाव ः प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाशी गद्दारी केलेल्या दक्षिण गोव्यातील केपे, नुवे,वेळ्ळी आणि काणकोण मतदारसंघातील गट समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हा सरचिटणीस प्रमोद फळदेसाई आणि रुई मिंनेंजिस् यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस यांनी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या आमदारांबरोबर काही पदाधिकार्‍यांनीही पक्षाशी गद्दारी केली असून त्यांना पदावरून ताबडतोब हटवले जाणार असल्याचे ज्यो डायस यांनी सांगितले.

पक्षत्याग करून जे दहा आमदार भाजपात गेले आहेत, त्यांनी काँगेस पक्षाचा, आणि ज्यांनी त्यांना मते दिली होती,त्या मतदारांचाही विश्वासघात केला आहे. काँग्रेस पक्ष मोठा असून या पक्षाला इतिहास आहे.दहा आमदार गेल्याने पक्षाची कोणतीही हानी झालेली नाही, असे डायस म्हणाले.काँगेस पक्षाने लोकांच्या आग्रहावरून या सर्वांना उमेदवारी दिली होती.या आमदारांनी काँग्रेस  सोडून भाजपात प्रवेश करून लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.त्यांना लोकच धडा शिकवतील.या दहाही आमदारांनी स्वतःच्या लाभासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला .मतदारसंघात विकास होत नसल्याने काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे काही आमदार सांगत आहेत,या आमदारांनी विकासकामांचे किती प्रस्ताव सरकार दरबारी सादर केले , असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सर्व बूथ स्तरीय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे, असे डायस यांनी सांगितले अनेक ठिकाणी नवीन बूथ समितीची स्थापना केली जाणार असून त्यानंतर गट समित्यांची स्थापना केली जाणार आहे.ज्या मतदारसंघातील काँग्रेस आमदारांनी पक्षाचा विश्वासघात केला आहे ,त्या त्या गट समिती अध्यक्षांशी पक्ष पदाधिकार्‍यांनी  संपर्क साधला आहे.त्यांच्यासमवेत बैठक घेतली जाणार आहे. त्याच बरोबर ज्या गट समितीाच्या पदाधिकार्‍यांनी पक्षाचा विश्वासघात केला ,त्यांना   निलंबीत केले जाणार आहे,अशी माहिती डायस यांनी दिली.