Mon, May 25, 2020 06:48होमपेज › Goa › पर्रिकरांच्या मुलाचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राजकीय लाभासाठी खोटं बोलू नका; पर्रिकरांच्या मुलाचे शरद पवारांना पत्र

Published On: Apr 15 2019 6:15PM | Last Updated: Apr 15 2019 6:31PM
पणजी : पुढारी ऑनलाईन

राजकीय फायद्यासाठी दिवंगत वडिलांचे नाव वापरणे दुर्दैवी आहे. शरद पवार यांनी खोटे बोलू नये, अशा आशयाचे पत्र भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांनी शरद पवार यांना लिहले आहे. यामध्ये उत्पल यांनी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. पवार यांनी म्हटले होते की, मनोहर पर्रिकर राफेल कराराशी सहमत नव्हते म्हणून त्यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्पल यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच पवारांना सल्ला देताना लिहले की, "माझ्या वडिलांचे नाव वापरून आणि खोटी माहिती पसरवून राजकीय लाभ घेण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न आहे. आपल्याला विनंती आहे की हे वागणं बंद करा." तसेच पवारांच्या या वक्तव्याने आपल्याला आणि कुटुंबाल धक्का बसला असून खूप वाईट वाटल्याचेही उत्पल म्हणाले. 

दरम्यान, कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते की, मनोहर पर्रिकरांना राफेल करार मान्य नव्हता. त्यासाठीच त्यांनी संरक्षण मंत्रिपद सोडले आणि ते गोव्यात परतले. विरोधक विशेषत: काँग्रेसनेही राफेलवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लक्ष केले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही काही दिवसांपूर्वीच एक दावा केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, आपण पर्रिकरांना भटलो होतो तेव्हा त्यांनी म्हटले होते की राफेल कराराची त्यांना काहीही माहिती नव्हती आणि त्या प्रक्रियेत त्यांना सामावूनही घेण्यात आले नव्हते. परंतु, मनोहर पर्रिकरांनी यावर लगेच खुलासा करत राहुल यांच्या वक्तव्यात तथ्य नसल्याचे सांगितले होते. तसेच एका आजारी माणसाला भेटण्याच्या बहाण्याने राहुल हे राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे टीकास्त्र सोडले होते.