Thu, Jul 02, 2020 14:51



होमपेज › Goa › खाणबंदीवर डिसेंबरपर्यंत तोडगा

खाणबंदीवर डिसेंबरपर्यंत तोडगा

Published On: Oct 05 2019 12:32AM | Last Updated: Oct 05 2019 12:32AM

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूस इतर अधिकारी.



पणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.  खाणबंदीवर येत्या डिसेंबरपर्यंत न्यायालयीन अथवा राजकीय तोडगा काढला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीहून बोलताना सांगितले. 

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत शुक्रवारी दुपारी सुमारे अडीच तास बैठक झाली. या बैठकीबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी व खाण मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील खाणी लवकर सुरू होण्याबाबत आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे. राज्यातील खाणी सुरू करण्यासाठी एकतर न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा अथवा संसदेत विद्यमान खाण कायद्यात बदल करण्याचा, असे दोन पर्याय खुले आहेत. या दोन्ही पर्यायांपैकी एकावर अंतिम निर्णय घेण्याचे बैठकीत निश्चीत करण्यात आले. 

शहा यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या गटाचीही लवकरच बैठक घेऊन अंतिम निर्णय घेऊ, असे बैठकीत सांगितले. या दोन्ही पर्यायांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. येत्या नोव्हेंबर अथवा किमान डिसेंबरपर्यंत खाणबंदीवर उपाय काढला जाणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्ली भेटीत केंद्रीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण, वन तथा माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन राज्याच्या पर्यावरणाशी निगडित प्रश्नांवर तसेच इफ्फीच्या आयोजनासंबंधी चर्चा केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.