Thu, May 28, 2020 20:04होमपेज › Goa › स्कार्लेट मृत्यूप्रकरणी सॅमसन डिसोझा दोषी

स्कार्लेट मृत्यूप्रकरणी सॅमसन डिसोझा दोषी

Published On: Jul 18 2019 1:57AM | Last Updated: Jul 18 2019 1:57AM
पणजी : प्रतिनिधी

गोव्यात गाजलेल्या  ब्रिटिश युवती स्कार्लेट किलींग हिच्या मृत्यूप्रकरणी  मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सॅमसन  डिसोझा याला दोषी ठरवले तर प्लासिडो कार्व्हालो याला निर्दोष ठरविले आहे.  डिसोझा याला न्यायालय शुक्रवारी शिक्षा सुनावणार आहे.

 उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. डी. धनुका व पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हा आदेश  व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे दिला. यावेळी  या प्रकरणातील आरोपी सॅमसन डिसोझा आणि स्कार्लेट हिची आई फियोना मॅकोव्हन  यांचे  वकील विक्रम वर्मा उपस्थित होते.

सदर मृत्यूप्रकरण हे 2008 सालचे आहे. या प्रकरणाला आता 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यावेळी हे प्रकरण केवळ देशातीलच  नव्हे तर विदेशातील प्रसारमाध्यमांमध्येही  प्रचंड गाजले होते. 
15 वर्षीय  ब्रिटीश युवती  स्कार्लेट ही गोव्यात सुटीसाठी आली होती. काही दिवसानंतर तिचा  मृतदेह हणजूण किनार्‍यावर फेब्रुवारी 2008 मध्ये आढळला होता.  स्कार्लेट हिला अमलीपदार्थ पाजून तिच्यावर बलात्कार करुन तिचा खून केल्याचा आरोप याप्रकरणी झाला होता.

स्कार्लेट मृत्युप्रकरणाचा तपास  स्थानिक पोलिसांऐवजी सीबीआयकडे सोपविला होता. सीबीआयने  या प्रकरणी स्थानिक सॅमसन  डिसोझा व प्लासिडो कार्व्हालो  यांच्यावर बलात्कार तसेच खुनप्रकरणी  आरोप ठेवला होता. मात्र,  2016 साली  गोवा बाल न्यायालयाने या दोन्ही संशयितांना निर्दोष मुक्‍त केले होते.

या निवाड्याला  सीबीआयने   फेब्रुवारी  2017 मध्ये  उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या  आव्हान याचिकेवर  उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.डी. धनुका  व पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर सुनाावणी झाली.   सीबीआयच्या वतीने   ज्येष्ठ वकील  एजाज खान यांनी बाजू मांडली. न्यायालयाने या प्रकरणातील दोन पैकी एक आरोपी  सॅमसन  डिसोझा याला दोषी ठरविले तर प्लासिडो कार्व्हालो याला निर्दोष ठरविले आहे.