Mon, May 25, 2020 09:35होमपेज › Goa › लोकसभेबाबत भाजपला पाठिंब्याचा फेरविचार  

लोकसभेबाबत भाजपला पाठिंब्याचा फेरविचार  

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 25 2018 12:52AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाणबंदीवर सरकारने त्वरित तोडगा काढावा अन्यथा  आगामी लोकसभा निवडणूक सत्ताधारी भाजपला त्रासाची ठरेल.  शिवाय येत्या लोकसभा निवडणुकीत  भाजपला पाठिंबा देण्याबाबतही गोवा फॉरवर्डला विचार करावा लागेल, असा इशारा  गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय  सरदेसाई यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मये मतदारसंघातील  काँग्रेसचे उमेदवार संतोषकुमार सावंत यांनी कार्यकर्त्यांसमवेत गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला. मंत्री सरदेसाई म्हणाले, गोंय, गोंयकार, गोंयकारपण हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे धोरण आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने राज्यात खाण बंदी लागू केल्याने खाण अवलंबितांवर अन्याय झाला आहे.  सरकारने या लोकांना न्याय देण्यासाठी त्वरित तोडगा काढावा. खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने वटहुकूम जारी करणे हा योग्य पर्याय ठरतो. खाणी सुरू करण्यासाठी सरकारने पावले न उचलल्यास सत्ताधारी  भाजप सरकारला  आगामी लोकसभा निवडणूक जड जाईल.  जनता त्यांना   पाठिंबा देणार नसून गोवा फॉरवर्डदेखील भाजपला पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करेल. 

खाणींबाबत तोडगा काढण्याबाबत  भाजप प्रदेशाध्यक्ष  तथा खासदार विनय तेंडुलकर यांच्याशी आपण चर्चा केली आहे.  तसेच सदर विषय त्यांच्यासाठी त्रासदायक ठरणार हेदेखील त्यांना सांगितल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

देशातील व गोव्यातील खाणप्रश्‍न हे दोन्ही वेगळे विषय आहेत. गोव्यातील खाण व्यवसायावर मोठ्या संख्येने लोक अवलंबून आहेत. खाणींचा लिलाव झाल्यास त्याचा स्थानिक खाण अवलंबितांना किती लाभ होईल, हा मोठा प्रश्‍न आहे.  त्यामुळे   खाणींविषयी  तोडगा काढावा, असा सरकारकडे आग्रह असल्याचेही  मंत्री सरदेसाई म्हणाले. 

सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे. जनतेला न्याय हवा  आहे. राज्य सरकारमधील घटक पक्ष  या नात्याने  गोवा फॉरवर्ड युती धर्म पाळत आहे. सरकार आमच्यामुळे स्थिर असल्याचेही सरदेसाई यांनी सांगितले. गोवा फॉरवर्डचे नेते तथा मंत्री जयेश साळगावकर, प्रवक्ते ट्रोजन डिमेलो, दुर्गादास कामत, प्रशांत नाईक, रेणूका डिसिल्वा व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

गोवा फॉरवर्डशिवाय सरकार स्थापण्याचे आव्हान

 गोवा फॉरवर्डच्या मदतीशिवाय कुठल्याही पक्षाने राज्यात सरकार स्थापन करून दाखवावे, असे आपण आव्हान देत असल्याचे  पक्षाध्यक्ष  विजय  सरदेसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, जनतेचा कौल हायजॅक केल्याचा काँग्रेसचा आरोप निरर्थक असून काँग्रेसकडूनच तियात्र सुरू आहे. कर्नाटकात त्यांना निवडणुकीनंतरची युती मान्य असेल तर  गोव्यात निवडणुकीनंतरच्या युतीवर  ते  टीका का करताहेत. काँग्रेस मगोसोबत युती करून सरकार स्थापन करण्याचे मनसुबे रचत असेल  तर त्यांचे हे  प्रयत्न आपण कधीच यशस्वी होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मये आता ‘फॉरवर्ड’ ः सावंत

 गोवा फॉरवर्डसोबत राहून मये फॉरवर्ड नेले जाईल, असा विश्‍वास पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या  संतोषकुमार सावंत यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या  उमेदवारीवर मये मतदारसंघातून  विधानसभा निवडणुकीत  पराभूत झालो तरी आपण काम सुरूच ठेवले. मात्र, काँग्रेसकडून  अपेक्षित सकार्य मिळाले नाही. अन्य मतदारसंघांच्या  तुलनेत मये विकासात 15 वर्षे मागे पडला आहे.  खाण व्यवसायावर मयेतील लोकदेखील मोठ्या संख्येने  अवलंबून असल्याने  खाणी त्वरित सुरू होणे  गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.