Tue, May 26, 2020 08:40होमपेज › Goa › अट्टल गुन्हेगार अन्वर शेखला तडीपार करण्यासाठी प्रस्ताव दाखल  

अट्टल गुन्हेगार अन्वर शेखला तडीपार करण्यासाठी प्रस्ताव दाखल  

Last Updated: Dec 16 2019 8:13PM

संग्रहित फोटोमडगाव : प्रतिनिधी

अट्टल गुन्हेगार अन्वर शेख याला तडीपार करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी अजित रॉय यांच्या कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ सरकारी वकील सुभाष देसाई शासनातर्फे  याप्रकरणी बाजू मांडणार आहेत. याप्रकरणी २७ डिसेंबर पासून सुनावणीस सुरवात होईल.

अन्वर शेख याच्या विरोधात दक्षिण गोव्यात २५ गंभीर गुन्हे नोंद करण्यात आले असल्याने गोवा पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यासमोर अन्वर याच्या तडीपारीसंबंधी अर्ज दाखल केला आहे. अन्वर हा गोव्यातील अट्टल गुन्हेगार असून गेल्या मे महिन्यात त्याने गोव्यातील एका युवतीचे अपहरण केले होते. यावेळी त्याने पीडित युवतीला धारवाड येथे एका खोलीत डांबून ठेवले होते. याशिवाय अन्वर व त्याचे साथीदार तुळशीदास राजू नाईक (वय-२७, मारुतीगड काकोडा), शिवदत्त तलवार (सांत ईनेज), राघवेंद्र देवर (मडगाव) यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. 

त्या युवतीला बराच काळ धारवाड येथे एका खोलीत बंदिस्त ठेवण्यात आले होते. महिलेचे अपहरण करणे तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी केपे पोलिसांनी १९ नोव्हेंबर २०१९ रोजी कर्नाटक येथील सौंदत्ती येथून संशयित अन्वर शेखला अटक केली होती. तसेच संशयित अन्वर व तुळशीदास यांनी ३ ऑगस्ट २०१८ रोजी पंटेमळ कुडचडे येथील गोरन फेर्नांडिस याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. असे अनेक गुन्हे दोन्ही संशयितावर नोंद करण्यात आले आहे. कुडचडे पोलिसांनी काकोडा येथील तुळशीदास याला तडीपार करण्यासंबंधीही जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आहे.