Mon, May 25, 2020 03:15होमपेज › Goa › ‘राफेल’ निवाड्यामुळे काँग्रेसचाच पर्दाफाश 

‘राफेल’ निवाड्यामुळे काँग्रेसचाच पर्दाफाश 

Published On: Dec 16 2018 1:35AM | Last Updated: Dec 16 2018 1:35AM
पणजी : प्रतिनिधी

राफेल खरेदी करारप्रश्‍नी  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यामुळे काँग्रेसचा पर्दाफाश झाला आहे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोवा विद्यापीठ पदवीदान सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्‍त केले. 

राफेल करार हा देशाच्या सुरक्षेच्या द‍ृष्टीने महत्त्वाचा असून संरक्षण क्षेत्र मजबूत  करण्यासाठी हा करार करण्यात आला होता. परंतु  काँग्रेसकडून यावर आरोप करण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.
केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले की, राफेल करारावर प्रश्‍न उपस्थित करुन  काँग्रेसने देशाच्या सुरक्षेसंदर्भातील तयारी कमजोर करण्याचा एकप्रकारे प्रयत्न केला. सदर करार हा प्रामाणिक करार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसला जर या प्रश्‍नी काही संशय होता तर त्यांनी संसदेत त्यावर चर्चा करणे अपेक्षित होती. त्यांनी चर्चा मागायला हवी होती. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे काँग्रेसच्या हेतूचा पर्दाफाश झाला आहे. सत्य काय ते जनतेच्या समोर आले आहे. काँग्रेसला या करारात अडथळे आणायचे होते. राफेल खरेदीबाबत तत्कालीन काँग्रेस सरकारने 2007 साली विलंब केला होता. मात्र विद्यमान एनडीए सरकारने हा खरेदी करार पूर्ण केला. राफेल कराराच्या मुद्याचा नुकत्याच पार पडलेल्या  पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपच्या निकालावर परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.