Wed, Jul 08, 2020 12:39होमपेज › Goa › ‘जायका’ची जलवाहिनी फुटली

‘जायका’ची जलवाहिनी फुटली

Published On: Jul 09 2019 1:12AM | Last Updated: Jul 08 2019 11:58PM
मडगाव : प्रतिनिधी

मोठा गाजावाजा करून जायका प्रकल्पांतर्गत घालण्यात आलेली जलवाहिनी दोन वर्षांत चौथ्यांदा फुटण्याचा प्रकार सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शेळपे येथे घडला. अचानक जलवाहिनी फुटल्याने सोमवारी दक्षिण गोव्यातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. जलवाहिनी फुटल्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांना मिळेपर्यंत सुमारे 5 एमएलडी  पाण्याची नासाडी झाली होती.

जायकाकडून दक्षिण गोव्यासाठी ही जलवाहिनी दोन वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली होती. या दोन वर्षांच्या कालावधीत देवळामळ, जानोडे येथे तब्बल तीन वेळा सदर जलवाहिनी फुटली होती. लुईस बर्जर प्रकरणामुळे जायका प्रकल्पाचे काम बरेच चर्चेत आले होते. आता चौथ्यांदा ही जलवाहिनी फुटल्याने जायकाच्या कामाची चौकशी केली जावी, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही जलवाहिनी शेळपे येथे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाकडे जाण्याच्या रस्त्याजवळ फुटली. यापूर्वी काही वेळापुरता जलशुद्धीकरण प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर अचानक पाणी सोडण्यात आल्याने पाण्याच्या दाबावामुळे शेळपे येथे उतारावर जलवाहिनीच्या मॅनहोलचे वेल्डिंग सुटलेे, आणि त्यातून सुमारे दहा मीटर उंचीचा पाण्याचा फवारा उडाला. जलवाहिनी फुटल्याचे समजताच पाणी पुरवठा बंद करण्यासाठी धावपळ करण्यात आली. पण या प्रक्रियेत सुमारे वीस मिनिटे गेल्याने 5 एमएलडी पाणी वाया गेले.

सदर जलवाहिनीद्वारे सासष्टी आणि वास्कोच्या काही भागांना पाणीपुरवठा केला जातो. जायकाच्या वाहिनीबरोबर जुनी वाहिनीसुद्धा कार्यरत होती. त्यामुळे पाणी पुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. जायकाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या मडगाव, सासष्टी तालुका आणि वास्कोमधील ठराविक भागांना सोमवारी पाणी पुरवठा होऊ शकला नाही.

कार्यकारी अभियंता श्रीकांत गांवकर यांनी सांगितले की, जायकाच्या जलवाहिनीतून शेळपे जलशुद्धीकरण प्रकल्पातून शिरवई प्रकल्पासाठी पाणीपुरवठा केला जातो. शिरवई प्रकल्प सुमारे 120 मीटर उंचीवर आहे. त्यामुळे कधी कधी वीज खंडित झाल्यास शिरवई येथून उंचावरून पाणी पुन्हा मागे येते. या जलवाहिनीला हवेचा दाब बाहेर जाण्यासाठी एअर व्हॉल्व बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पण्याच्या दाबामुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती त्यांनी दिली. जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

 हीच जलवाहिनी चार महिन्यांपूर्वी देवळामळ येथे फुटली होती.कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या जलवाहिनीची चौकशी केली जावी, अशी मागणी लोक करत आहेत. राज्याला सुरळीत आणि अखंड पाणी पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून शेळपे येथे पूर्वीच्या साळावली जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ जायकाचा दोनशे एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा विध्वंस करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी डोंगर कापणी बरोबर जलवाहिनीसाठी हजारोंच्या संख्येने झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. जायकाच्या या प्रकल्पासाठी पीएमसी या सल्लागार कंपनीची नियुक्‍ती करण्यात आली होती. पीएमसी या सल्लागार कंपनीचे चार भागीदार असून एक लाचखोरीच्या प्रकरणात गाजत असलेली लुईस बर्जर कंपनी आहे, दुसरी एक जपानस्थित कंपनी आहे तर अन्य दोन भारतीय कंपन्या आहेत.पीएमसीला या कामी कित्येक कोटी रुपयांचे शुल्क देण्यात आलेले आहे.त्यानंतर जायकाच्या या कामासाठी दिल्लीस्थित एसएटी या कंपनीची नियुक्‍ती करण्यात आली होती.

चौकशीसाठी पथक : पाऊसकर
जलवाहिनी फुटण्याच्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली. वेल्डिंग सुटल्याने जलवाहिनी फुटल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून लवकरात लवकर दुरुस्ती काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलेे.