होमपेज › Goa › निवडणूक लढतींचे चित्र आज होणार स्पष्ट 

निवडणूक लढतींचे चित्र आज होणार स्पष्ट 

Published On: Apr 08 2019 1:54AM | Last Updated: Apr 07 2019 11:57PM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील लोकसभेच्या दोन आणि पोटनिवडणुकीच्या तीन जागांसाठी उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार (दि.8) अखेरचा दिवस आहे. यानंतरच निवडणूक रिंगणात नेमके किती उमेदवार राहणार आहेत, हे  चित्र स्पष्ट होणार आहे. 

लोकसभेच्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा मतदारसंघासाठी तसेच मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा या तीन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून विद्यमान खासदार तथा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह गिरीश चोडणकर (काँग्रेस), प्रदीप पाडगावकर (आम आदमी पक्ष), अमित आत्माराम कोरगावकर (आरपीआय), ऐश्‍वर्या साळगावकर (अपक्ष)  आणि भगवंत सदानंद कामत (अपक्ष) या सहा उमेदवारांचे अर्ज वैध  ठरले  आहेत. 

दक्षिण गोव्यात छाननीनंतर अ‍ॅड. नरेंद्र सावईकर (भाजप), फ्रान्सिस सार्दिन (काँग्रेस), एल्विस गोम्स (आम आदमी पक्ष), राखी नाईक प्रभूदेसाई (शिवसेना), डॉ. कालिदास वायंगणकर (अपक्ष) व मयूर काणकोणकर (अपक्ष) हे सहा उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 

शुक्रवार दि. 5 एप्रिल रोजी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी प्रत्येकी सहा मिळून एकूण 12 उमेदवारांचे अर्ज  वैध ठरले. तर म्हापसा-7, मांद्रे-5 आणि शिरोडा -6  या पोटनिवडणुकीत एकूण 18 उमेदवारांचे अर्ज वैध  ठरले  आहेत.  या दोन्ही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार अखेरचा दिवस  आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांची निश्‍चित आकडेवारी स्पष्ट होणार आहे. येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही  निवडणुकांसाठीची मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे.