Mon, May 25, 2020 13:16होमपेज › Goa › पणजीची जनता स्वाभिमानी; विकाऊ नाही

पणजीची जनता स्वाभिमानी; विकाऊ नाही

Published On: May 15 2019 1:51AM | Last Updated: May 14 2019 11:18PM
पणजी:प्रतिनिधी

राजकारर्ण्यांनी मतदारांवर पैसा ओतून त्यांना लाचार करून सोडले आहे. परंतु पणजीवासिय दरिद्री नसून अशा प्रलोभलांना ते भुलणार नाहीत. पणजीची जनता भ्रष्ट व गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवाराला कदापि पाठिंबा देणार नाही. पणजीची जनता स्वाभिमानी असून बिकाऊ नाही, असे प्रतिपादन गोवा सुरक्षा मंच चे उमेदवार प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले. गोवा सुरक्षा मंचतर्फे आयोजित रॅलीनंतर बॉक द वॉक येथे झालेल्या जाहीरसभेत वेलिंगकर बोलत होते. यावेळी पक्षाने पदाधिकारी व समर्थक उपस्थित होते. 

वेलिंगकर म्हणाले, समाजात काही लोक असेही आहेत जे उमेदवारांकडुन वाटलेले पैसे घेतील, परंतु मते मात्र आपली  सदविवेकबुध्दी सांगते त्यालाच देतील. पणजीवासीयांना या निवडणुकीत विचार करून मत देण्याची वेळ आली आहे.  पणजीची पोटनिवडणूक गोसुमं ने जिंकली तर संपूर्ण राज्यावर आम्ही अधिपत्य गाजवू, असेही त्यांनी सांगितले.   

समाजात चांगले तसेच वाईट राजकारणी आहेत. परंतु त्यातही काही कीड लागलेल्या आंब्याप्रमाणे किडलेले राजकारणी असून हे  अन्य राजकारण्यांनाही  कीड लावत आहेत. त्यांना मुळापासून बाहेर फेकण्याची वेळ आली आहे. हेच राजकारणी,  देशाचे भविष्य असलेल्या युवकांना,  गुन्हेगारी व भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे नारे द्यायला शिकवित आहेत. एक जबाबदार नागरिक या नात्याने कीड लागलेल्या राजकारण्यांच्या हाती युवकांचे भवितव्य सोपवणे  चुकीचे आहे,असे वेलिंगकर म्हणाले. 

राजकारणी विश्‍वासघातकी झाले आहेत. भारतीय जनता पक्ष आधी सत्य व विकासाच्या वाटेवरून सुरू झाला होता. मात्र  आता  भाजपच्या डोक्यावर सत्ता चढली असून त्यांना सत्तेचा माज आला आहे. भाजपने सरकारला संगीतखुर्चीचा खेळ बनवला असून  त्यांनी जनतेला कमीतकमी कालावधीत जास्तीतजास्त मुख्यमंत्री दिले,असेही ते म्हणाले.   

भाजपचा स्वत:च्या आमदारांना घेऊन सत्तेवर आल्यानंतरचा सुंदर चेहरा आता भ्रष्टाचारामुळे भकास दिसू लागला आहे. भाजप केवळ अन्य पक्षातून आमदार चोरण्यात गुंतलेले आहे. भाजप चे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना राज्यात बहुतांश  लोक  ओळखतच नसल्याने त्यांनाच आपण मुख्यमंत्री असल्याचे लोकांना सांगावे लागत आहे, अशी टीका वेलिंगकर यांनी केली. 

भाजप चे उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी  स्मार्ट सिटी व जीएसआयडीसी च्या नावाखाली भरभरून भ्रष्टाचार केला आहे. काण व्यवसाय बंद करून खाण अवलंबितांच्या पोटावर पाय मारून सरकारने त्यांना मांडवीचा तिसरा पूल दाखवून गुंडाळले. या पुलावरचा  विजेचा एक खांब 20 लाख  रुपये अशी गणिते दाखवून कुंकळ्येकरांनी लोकांना  लुटले आहे,अशी टीकाही त्यांनी केली. 

काँग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांनी भाजपमधून काँग्रेस व काँग्रेस मधून भाजप असा प्रवास अनेकदा केला असल्याने त्यांना आपण कोणत्या पक्षात आहोत, हे देखील कळेनासे झाले आहे.  भाजपने ताळगाव पंचायत निवडणुकीत जाणून बुजून  आपले पॅनल न ठेवता ताळगाव मोन्सेरात यांच्या हवाली केले आहे.