Wed, Jul 08, 2020 14:25होमपेज › Goa › पणजीतील जनसुनावणीतही सीझेडएमपीला तीव्र विरोध

पणजीतील जनसुनावणीतही सीझेडएमपीला तीव्र विरोध

Published On: Aug 04 2019 1:50AM | Last Updated: Aug 04 2019 1:50AM

पणजी ः प्रतिनिधी
किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यास (सीझेडएमपी) राज्यभरात विरोध होत असताना शनिवारी पाटो-पणजी येथील कला आणि संस्कृती भवनाच्या सभागृहात तालुक्यासाठी आयोजित सीझेडएमपी सादरीकरणावेळी नागरिकांनीही त्याला जोरदार विरोध दर्शविला. यावेळी पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल देखील उपस्थित होते. सीझेडएमपी जर जनतेच्या हिताचा असेल, तर त्याबाबत जनतेला विश्‍वासात का घेतले जात नाही, असा सवाल यावेळी सादरीकरणाला उपस्थित संतप्‍त नागरिकांनी केला. जनतेला विश्‍वासात घेऊनच हा आराखडा अधिसूचीत करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
या सादरीकरणावेळी सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक, भाजपचे नेते रामराव वाघ, तसेच तिसवाडीतील विविध पंचायतींचे सरपंच, पंच, नागरिक तसेच स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारने आराखड्याबाबत सूचना आणि हरकती नोंदविण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे सरकारने 31 ऑगस्टपर्यंत सीझेडएमपीचा नवा आराखडा सादर करण्याचे आश्‍वासन राष्ट्रीय हरित लवादाला दिले आहे. इतक्या कमी वेळात सरकार सूचना, हरकती घेऊन त्याप्रमाणे कसा काय आराखडा तयार करणार, जनसुनावण्या दाखवून आणि उपस्थित लोकांच्या सह्या घेऊन जनतेने आराखड्याला मंजुरी दिल्याचे खोटे सांगितले जात आहे. कोळसा वाहतूकदारांच्या फायद्यासाठी हा आराखडा तयार केला जात असल्याचा आरोपही या जनसुनावणीवेळी करण्यात आला.
सीझेडएमपीबाबत गावागावांत जाऊन जनसुनावणी घ्यावी. या आराखड्याबाबत नागरिकांना विश्‍वासात घेतले जावे. मात्र, प्रत्यक्षात सरकार जनतेला विश्‍वासात घेत नाही. मच्छीमारांची गावे, खारफुटी, संवेदनशील क्षेत्र, खाजन जमिनी तसेच वारसास्थळांच्या जमिनींचा आराखड्यात समावेश करण्यात आलेला नाही, असे आक्षेप यावेळी घेण्यात आले.
आमदार फ्रान्सिस सिल्वेरा म्हणाले, सीझेडएमपीचा आराखडा पूर्णपणे चुकीचा आहे. आराखड्यासंदर्भात जनतेला विश्वासात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकारने हा आराखडा रद्द करून प्रत्येक पंचायतींतील नागरिकांशी चर्चा करावी. त्यांच्याकडून सूचना, हरकती मागवून जनतेला हवा तसा आराखडा मंजूर करावा. याबाबत आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.