Fri, May 29, 2020 21:44होमपेज › Goa › आयात मासळीचे 50 ट्रक  माघारी

आयात मासळीचे 50 ट्रक  माघारी

Published On: Oct 28 2018 1:33AM | Last Updated: Oct 28 2018 12:43AMपणजी : प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी न करताच  परराज्यातून गोव्यात मासळी घेऊन  येणारे 50 ट्रक शनिवारी (दि.27) पहाटे परत पाठवण्यात आले. यात पोळे चेकपोस्टवरून येणार्‍या 40 व  पत्रादेवी चेकपोस्टवरून  येणार्‍या  10  ट्रकांचा समावेश असल्याचे  अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे यांनी  येथे पत्रकार परिषदेत  सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाचे पथक यापुढे रविवारपासून (दि.28) रोज घाऊक मासळी बाजारात जाऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घरगुती सेवनासाठीची मासळी घेऊन येणारे सरासरी 82 ट्रक तर  निर्यातीसाठीची मासळी घेऊन येणारे 100 ट्रक रोज गोव्यात दाखल होतात, असे सांगून मंत्री राणे म्हणाले,  परराज्यातून गोव्यात मासळी घेऊन येणार्‍या ट्रकांना संबंधित राज्यातील अन्न   व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे सक्तीचे असून सरकारकडून    यात कुठलीही शिथिलता केली जाणार  नाही.    याबाबत पोलिसांनादेखील कडक निर्देश दिले आहेत.   पत्रादेवी व पोळे चेकपोस्टवर  येणार्‍या या मासळीवाहू ट्रकांची तपासणी  पोलिसांकडून केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

वरील दोन्ही चेकपोस्ट वगळता मोले, केरी, दोडामार्ग येथूनही मासळीवाहू ट्रक परराज्यातून गोव्यात येत असल्याने त्याठिकाणीदेखील आता तपासणी केली जाणार  आहे. यासंदर्भात सोमवारी (दि.29) पोलिस उपमहानिरीक्षकांशी चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाचे नियम काटेकोरपणे पाळलेच पाहिजेत. यात कुठलीही मुभा दिली जाणार नाहीत.  हॉटेल्स, पंचतारांकीत हॉटेल्सकडे  मासळी वाहतुकीबाबत चर्चा केली जाणार आहे. परराज्यातून ते मागवत असलेल्या मासळीसाठी सरकार पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी तयार आहे. परंतु त्यांना वरील नोंदणी सक्तीची असून  यासाठी प्रक्रिया गतीने हाताळली जाईल, असे  मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. मासळी तपासणीसाठी पूर्ण क्षमतेची अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी   दक्षिण गोव्यात जागेची पाहणी येत्या दोन दिवसांत केली जाणार आहे. कृषी मंत्री विजय सरदेसाई यांना सोबत घेऊन ती पाहणी केली जाईल. सुरुवातीला म्हापसा येथील आझिलो इस्पितळ इमारतीत ही प्रयोगशाळा उभारण्याचा विचार होता. परंतु दक्षिण गोव्यात ती उभारण्यात यावी, अशी मागणी  करण्यात आल्याने त्यात बदल करण्यात आला. या पाहणी संदर्भातील अहवाल केंद्राला पाठवण्यात येणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.  यावेळी  अन्न व औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई उपस्थित होत्या.