Wed, May 27, 2020 16:48होमपेज › Goa › पाऊसकरांना बांधकाम खाते; आजगावकरांना उपमुख्यमंत्रिपद

पाऊसकरांना बांधकाम खाते; आजगावकरांना उपमुख्यमंत्रिपद

Published On: Mar 29 2019 1:37AM | Last Updated: Mar 29 2019 12:03AM
पणजी : प्रतिनिधी

भाजप आघाडी सरकारच्या  मंत्रिमंडळात प्रथमच सामील झालेले दीपक पाऊसकर यांना सार्वजनिक बांधकाम आणि संग्रहालय खाती देण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकरांकडे जुनीच पर्यटन, क्रीडा आणि मुद्रणालय खाती असून त्यांना नवी कोणतीही खाती मिळाली नाहीत. माजी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे असलेले वाहतूक व नदी परिवहन ही खाती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्याकडे ठेवली आहेत. अन्य मंत्र्यांची खाती तशीच राहिली असल्याचा आदेश सर्वसाधारण प्रशासन खात्याच्या संयुक्‍त सचिव वर्षा नाईक  यांनी गुरूवारी संध्याकाळी काढला. 

मगो पक्षातून     फुटून मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांनी बुधवारी पहाटे भाजपात प्रवेश केला होता. पाऊसकर यांचा बुधवारी रात्री 11.30 वाजता शपथविधी पार पडला. त्यांना अपेक्षेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री पदावर विजय सरदेसाई आणि मनोहर आजगावकर यांना नेमण्यात आले असल्याचा आणखी एक आदेश सर्वसाधारण प्रशासन खात्याचे संयुक्त सचिव वर्षा नाईक यांनी गुरूवारी काढला. याआधी 20 मार्च रोजी जारी करण्यात आलेला तसेच सुदिन ढवळीकर यांना उपमुख्यमंत्री नेमण्यात आल्याचा आदेश गुरूवारच्या आदेशामुळे रद्दबातल झाल्याचे नाईक यांनी नमूद केले आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे आधीच्या खात्यांव्यतिरिक्‍त  सुदिन ढवळीकर यांच्याकडे असलेली वाहतूक आणि नदी परिवहन ही खातीही आली आहेत.