Wed, Apr 01, 2020 14:49होमपेज › Goa › जीवनावश्यक वस्तू, औषधे ग्राहकांना थेट घरी पुरवा

जीवनावश्यक वस्तू, औषधे ग्राहकांना थेट घरी पुरवा

Last Updated: Mar 25 2020 11:04PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील भुसारी, स्वस्त धान्याची दुकाने  आणि फार्मसी आदी दुकानदारांनी जीवनावश्यक वस्तूंचा व औषधांचा पुरवठा ग्राहकांना थेट त्यांच्या घरी करावा, मात्र, त्यासाठी तालुक्याच्या उपजिल्हाधिकार्‍यांकडून आधी  परवानगी घ्यावी. तसेच कोणत्याही वस्तूंवर अधिक किंमत आकारू नये. विविध भागातील पेट्रोलपंप एक दिवसाआड  खुले ठेऊन ग्राहकांना इंधन पुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिले. घरात एकट्याने राहणारे अथवा आजारी असलेल्यांसाठी त्यांनी  मदतीसाठी संपर्क क्रमांकही  जाहीर केले.

मुख्यमंत्री सावंत यांनी मंगळवारी धान्य व अन्य जीवनावश्यक वस्तू लोकांना घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.  याविषयी, बुधवारी सकाळी सरकारी अधिकार्‍यांची उच्च स्तरीय बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.  या बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना  सांगितले, की  राज्यातील काही भागातील भुसारी आणि स्वस्त धान्य दुकानदारांना जवळच्या ग्राहकांना  वस्तू घरपोच देण्याची सेवा सुरू करण्यास मान्यता देण्यात येणार आहे. दुकाने खुली ठेवता येणार नाहीत.  या दुकांनातून  माल वाहतूक करणार्‍यांना ‘कर्फ्यू पासेस’ दिले जाणार आहेत. सदर पासेससाठी दुकानदाराला उपजिल्हाधिकार्‍यांकडे  अर्ज सादर करावा लागणार आहे. सदर सेवा ऑनलाईनही सुरू केली जाणार आहे. मात्र, सदर दुकानदारांनी जीवनावश्यक माल पुरवठा करण्यासाठी अधिक किंमत ग्राहकांकडून वसूल करता येणार नाही. 

मुख्यमंत्री म्हणाले, की केंद्र सरकारने लागू केलेल्या 21 दिवसांच्या ‘लॉकडाऊन ’संबंधी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांना  स्थानिकसंदर्भात काही सूचना जोडण्यात येणार आहेत.  राज्यात पुढील 21 दिवस पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तूंचा साठा असून काही वस्तू अन्य राज्यातून मागून घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रीयीकृत  व वर्गीकृत बँका आणि फार्मसीमध्ये कमीत कमी कर्मचार्‍यांचा वापर करून सेवा सुरू ठेवता येणार असल्या  तरी ग्राहकांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. विविध भागातील पेट्रोलपंप एक दिवसाआड  खुले ठेवून ग्राहकांना इंधन पुरवठा करण्यास सांगितले आहे. 

वैद्यकीय मदतीसाठी हेल्पलाईन

गरजूंना वैद्यकीय मदत आणि औषधांचा पुरवठा करण्यासाठी ‘104’, ‘7823026971’ आणि‘9607909559 (वॉट्सअ‍ॅप) ’ असे खास ‘हेल्पलाईन ’ क्रमांक राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आले. याशिवाय, आंतरराज्य  आणि अंतर्गत भागात वाहतूक करण्यासाठी खास (0832-2419550) या क्रमांकावर ‘कंट्रोल रुम’ उघडण्यात आला असून सुदिन नातू यांना प्रमुख नेमण्यात आले आहे. उत्तर गोव्यासाठी प्रवीण गावस (0832-2225083) आणि दक्षिण गोव्यासाठी (0832-2794100) इशांत सावंत यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली  आहे.