Sun, May 31, 2020 14:40होमपेज › Goa › सभापतीवर अविश्‍वासाची नोटीस बेकायदेशीरपणे फेटाळली : कवळेकर

सभापतीवर अविश्‍वासाची नोटीस बेकायदेशीरपणे फेटाळली : कवळेकर

Published On: Oct 05 2018 1:08AM | Last Updated: Oct 05 2018 1:08AMपणजी : प्रतिनिधी

काँग्रेसकडून  सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरोधात सादर केलेली अविश्‍वास ठरावाची नोटीस बेकायदेशीरपणे  फेटाळण्यात आली आहे. सरकारकडे बहुमत आहे तर ते सिध्द करण्यासाठी एका दिवसांचे अधिवेशन का बोलवत नाही, असा प्रश्‍न  विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

बहुमत सिध्द करता येत नसल्याने    सरकार भयभीत झाले आहे. त्यामुळेच  सभापतींविरोधात दाखल करण्यात आलेली अविश्‍वास ठराव नोटीस फेटाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

कवळेकर म्हणाले, की बहुमत सिध्द करण्याची काँग्रेसला संधी द्यावी, अशी  तीन वेळा  राज्यपालांकडे   मागणी करण्यात आली. मात्र, सदर मागणी फेटाळ्यात आली. सरकारकडे जर बहुमत आहे तर ते सिध्द करण्यासाठी एक दिवसाचे अधिवेशन का बोलावले जात नाही, सरकार असून आणि नसून सारखेच असून विरोधी पक्षाला गृहीत धरले जात नाही.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, की सभापतींविरोधात  काँग्रेसच्या 16 आमदारांनी सह्या करुन ही अविश्‍वासाची नोटीस  सादर केली होती. परंतु सभापती विरोधातील ही नोटीस सभापतीच फेटाळतात आहे हे पाहण्यास मिळाले. नोटीस फेटाळण्याची कृती अयोग्य आहे. सरकारला  केवळ सत्ता दिसत असून त्यांना लोकांचे हित दिसत नाही. सरकार आपल्याला हवे तेच करीत असून त्यांचे हे वागणे घातक  आहे.

 अ‍ॅड. रमाकांत खलप म्हणाले,  कायद्याने एक आमदार देखील  अविश्‍वास ठरावाची नोटीस देऊ शकतो. काँग्रेसच्या तर 16 आमदारांनी या नोटीशीवर सह्या केल्या आहेत. सभापतींनी ही अविश्‍वास नोटीस कुठल्या आधारे फेटाळली  हे स्पष्ट केले नाही. या संदर्भातील रेकॉर्डची मागणी काँग्रेस करणार आहे. त्याचबरोबर सभापतींविरोधात पुन्हा एकदा अविश्‍वास ठरावाची नोटीस सादर केली जाईल. अविश्‍वास ठराव फेटाळण्याचा निर्णय  योग्य  नसून ते  नियमांप्रमाणे नाही.